पंतप्रधानपदावर आपली नजर नसल्याचाही दावा : अटलजींबद्दल आदरभाव व्यक्त
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव यांनी ‘इंडिया’वर नाराजीचे वृत्त फेटाळले आहे. मला कोणत्याही गोष्टीचा राग नाही, असे त्यांनी सोमवारी सांगितले. तसेच आपल्याला कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘इंडिया’ची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडल्यापासून नितीशकुमार नाराज असल्याचे वृत्त पसरले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पहिल्यांदाच आपल्या नाराजीवर मौन सोडले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा राग नसल्याचे त्यांनी परखडपणे सांगितले. तसेच पक्षातील फुटीच्या मुद्द्यावर माध्यमांना उत्तर देताना, कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही, कारण आजकाल लोक फायदा मिळवण्यासाठी काहीही बोलतात. याचा फायदा कोणालाच होणार नाही. आपल्या पक्षात (जेडीयू) कोणीही बाहेर पडलेला नाही. पक्षात सर्वजण एकत्र आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान, माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्याबद्दल आपल्या मनात आदरभाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाराज असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे
प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘इंडिया’ आघाडीच्या निर्णयावर नाराजी असल्याच्या प्रश्नावर नितीशकुमार यांनी मीडियाला फटकारले. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या निर्णयावर आपण अजिबात नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. नाराजीचा मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे. मला या पदाची इच्छा नसल्याचे मी अनेकदा सांगितले आहे, असे ते म्हणाले. याचवेळी नितीश यांच्या संवादादरम्यान तेजस्वीही बोलले. नुकत्याच झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर नितीशकुमार संयुक्त पत्रकार परिषदेला हजर न राहिल्यामुळे ते नाराज असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, आता खरी बाब बाहेर आल्याचे त्यांनी सांगितले.









