भावाची मिळकत बळकाविण्यासाठी खून
बेळगाव : लहान भावाची मिळकत बळकाविण्यासाठी त्याचा खून करून अपघात भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सौंदत्ती तालुक्यातील गोरवनकोळ्ळजवळ हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी खून झालेल्या युवकाच्या मोठ्या भावासह दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी शनिवारी यासंबंधीची माहिती दिली आहे. खुनानंतर मोटारसायकलसह या युवकाला गावाजवळील कालव्यात फेकण्यात आले होते. पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता अपघात प्रकरणाचे रुपांतर खुनात झाले आहे.
मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी महांतेश शिवनाप्पा अळगोडी (वय 42) या युवकाचा मृतदेह कालव्यात आढळून आला होता. महांतेशच्या कुटुंबीयांनी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सौंदत्ती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. मात्र, एकंदर प्रकार पाहता पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे बिम्समधील तज्ञांकडून शवचिकित्सा करण्यात आली. महांतेशचा मृत्यू अपघातात झाला नसून गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक करुणेश गौडा जी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. सिद्धाप्पा शिवनाप्पा अळगोडी (वय 45) रा. गोरवनकोळ्ळ व बाबू लमाणी (वय 35) रा. कटमळी तांडा या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवनाप्पा खून झालेल्या महांतेशचा मोठा भाऊ असून महांतेशची मिळकत बळकाविण्यासाठी बाबूच्या मदतीने त्याचा खून करून तो अपघात भासविण्यासाठी मोटारसायकलसह त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.









