वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पेहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर हल्ला केलेल्या एकाही दहशतवाद्याला आम्ही सोडणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुरुवारी हे विधान केले. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वात देश प्रगती करीत आहे. दहशतवाद या प्रगतीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पेहलगाम हल्ला हा या मनोवृत्तीतून काला आहे. मात्र, आम्ही हा हल्ला केलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला टिपून संपविणार आहोत. तसेच भारतातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यात येणार आहे, असे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही परिस्थितीत कोणताही दहशतवाद खपवून घ्यायचा नाही, असे आमच्या सरकारचे धोरण आहे. देशातल्या दहशतवादाविरोधात आम्ही कठोर कारवाई करीत आहोत. ईशान्य भारतातील नक्षलवाद असो, किंवा छत्तीसगडमधील माओवाद असो, आम्ही दहशतवादाविरोधात शून्य सहनशक्ती हे धोरण स्वीकारले आहे. काश्मीरी दहशतवादालाही आम्ही अशाच प्रकारे संपविणार आहोत. देशवासियांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांना जे हवे आहे ते आम्ही करणार आहोत, असे प्रतिपादनही अमित शहा यांनी आपल्या भाषणात केले आहे.









