पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती ; आतापर्यंत 32 गायींना लंपी रोगाची लागण.प्रत्येक तालुक्यातील गुरांना लस देण्याची सोय,आतापर्यंत 22 हजार गुरांना दिली लस
पणजी : गोवा राज्यात आतापर्यंत ‘लंपी’ रोगाची लागण झालेल्या एकूण 32 गायी सापडल्या असून त्यांना शिकेरी – मये येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुऊ असून त्या रोगामुळे गोव्यात एकही गुराचा बळी गेला नसल्याचा दावा पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘लंपी’ रोगग्रस्त गायी आता उपचारानंतर सावरल्या असून त्या बऱ्या होत आहेत. त्यांच्यासाठी लस टोचणी मोहीम उघडण्यात आली असून ती आजही सुऊ आहे. हा रोग होऊ नये म्हणून 22 हजार लसी आतापर्यंत गायींना देण्यात आली असून तेवढेच डोस पुन्हा मागवण्यात आले आहेत. हा ‘लंपी’ रोग सर्वत्र पसऊ नये म्हणून गुरांची आवक व गोव्यात होणारी वाहतूक गेले दोन महिने बंद करण्यात आली असून ती बंदी आणखी काही काळ वाढवली आहे. त्यामुळे हा रोग नियंत्रणात असल्याची माहिती हळर्णकर यांनी दिली.
प्रत्येक तालुक्यात लस देण्याची सोय
गोव्यातील सर्व पंचायती, पालिका क्षेत्रात या लसीकरण मोहिमेची माहिती व्हावी म्हणून त्यांना खात्यातर्फे पत्रे पाठवण्यात आली असून माहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी डॉ. मिना कुमारी यांची प्रकल्प अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून नियुक्ती केली आहे. तालुका पातळीवर लस देण्याची सोय करण्यात आली असून त्यांचे संपर्क क्रमांक पत्रातून देण्यात आले आहेत. पंचायत, पालिका क्षेत्रात या रोगाचे गुरे आढळली तर त्याची माहिती फोनवर देऊन लस टोचणी करता येणे शक्य आहे, असे त्यांनी पुढे बोलताना नमूद केले.
बोगमाळोत चार दिवसांत 19 गुरांचा संशयास्पद मृत्यू
बोगमाळो गावांत मागच्या चार दिवसांपासून एका मागोमाग गुरे दगावली जाऊ लागल्याने खळबळ माजली आहे. मागच्या चार दिवसांपासून एकूण 19 गुरे संशयास्पदरित्या मृत झाल्याचे आढळून आलेले असून या गुरांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. गुरांच्या मृत्यूचे कारण लंपी हा रोग आहे की अन्य काही कारण आहे, हे कळायला मार्ग नाही. बोगमाळो पंचायत क्षेत्रातील चिकोळणा बोगमाळो गावात गुरे दगावत चालल्याची माहिती पंचायतीला मिळत होती. हळुहळु या प्रकारात वाढ होत गेली. प्रथम कुणालाच हा प्रकार गांभिर्याने घ्यावासा वाटला नाही. पंचायतीनेच मृत गुरांची विल्हेवाट लावण्याचे काम केले. मात्र, गरे मृत होण्याची संख्या वाढू लागल्याने स्थानिक लोक आणि पंचायतीला संशय वाटू लागला आहे.
गुरांच्या मृत्यूबाबत वाढता संशय
काल मंगळवारी सकाळी अशीच एक गाय मृतावस्थेत आढळून आली. त्यामुळे पशु वैद्याला बोलावून आणण्यात आले. मात्र, या गाईचा मृत्यू कसा झाला याबाबत निदान होऊ शकलेले नाही. आतापर्यंत मागच्या चार दिवसात 18 गायी आणि 1 म्हशीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झालेला असून या मृत्यूमागे लंपी रोग आहे की त्यांना विषबाधा होऊन मृत्यू आला आहे की यामागे अन्य काही कारणे आहेत याबाबत तपास करण्यात यावा अशी मागणी लोक करीत आहेत. यासंबधी पोलिसानाही कळवण्यात आले आहे. बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले यांनीही गुरांच्य मृत्यूबाबत चिंता व्यक्त करून या संशस्पद मृत्यूंचा तपास होण्याची आवश्कयता व्यक्त पेली आहे.









