वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
क्लासिक बुद्धिबळमध्ये सर्वांत भक्कम प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याची क्षमता असलेले विश्वविजेता डी. गुकेश आणि अर्जुन एरिगेसी हे आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे आव्हान सांभाळतील. या स्पर्धेत त्यांना मॅग्नस कार्लसन आणि हिकारू नाकामुरा यांच्यासारख्या खेळाडूंविऊद्ध लढावे लागेल.
पुऊष आणि महिला विभागातील सहा खेळाडूंचा समावेश असलेली आणि डबल राउंड-रॉबिन स्वरूपात खेळली जाणारी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा ही बुद्धिबळ कॅलेंडरवरील सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहे. महिला विभागात भारताचे प्रतिनिधीत्व दोन वेळा महिला जागतिक रॅपिड चॅम्पियन बनलेली कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली करतील. पुऊष विभागात भारताचे दोन खेळाडू असण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे 2013 मध्ये पहिल्यांदा खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताला पहिले विजेतेपद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यावेळी पाच वेळा विश्वविजेता बनलेल्या विश्वनाथन आनंदसह या क्षेत्रातील 10 सर्वोत्तम खेळाडूंचा त्या स्पर्धेत समावेश राहिला होता. अर्ध्या डझनहून अधिक वेळा ही स्पर्धा खेळलेल्या आणि 2015 मध्ये उपविजेत्या राहिलेल्या आनंदने अलीकडेच म्हटले होते की, गुकेश आणि अर्जुन या दोघांनाही पाच वेळचा विश्वविजेता कार्लसनला मागे टाकण्याच्या दृष्टीने प्रेरणा किंवा दृढनिश्चयाची कमतरता भासणार नाही. त्यांना येथे खूपच रोमांचक लढाई अपेक्षित आहे.
चार भारतीयांची स्पर्धेत उपस्थिती देशातील बुद्धिबळाच्या वाढीला देखील स्पष्ट करते. असे असले, तरी कार्लसन आणि अमेरिकन ग्रँडमास्टर नाकामुरा तसेच जू वेनजुन आणि ली टिंगजी या चिनी महिला जोडीला मागे टाकणे हे सोपे काम राहणार नाही. नाकामुरा कार्लसननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि जर खेळ अनिर्णित राहून आर्मागेडन स्वरूपात गेला, तर नाकामुरा हरविण्यास सर्वांत कठीण प्रतिस्पर्ध्यांपैकी एक ठरेल.









