वृत्तसंस्था/ केपटाऊन
विंडीज विरुद्ध होणाऱया दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ऍनरिच नॉर्त्जे दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, अशी माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने दिली आहे. विंडीज विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने दर्जेदार कामगिरी केली होती.
विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत नॉर्त्जेने विंडीजच्या पहिल्या डावात 36 धावात 5 तर दुसऱया डावात 48 धावात 1 गडी बाद केला होता. दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी 87 धावांनी जिंकून विंडीजवर आघाडी मिळविली आहे. उभय संघातील दोन सामन्यांची ही कसोटी मालिका आयसीसीच्या विश्वचषक कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका संघाचे अंतिम फेरीसाठीचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. विश्वचषक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 जून रोजी ओव्हल मैदानावर खेळविला जाणार आहे. नॉर्त्जेच्या जागी अद्याप क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दुसऱया बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यातील दुसरी कसोटी जोहान्सबर्गमध्ये 8 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ- बेहुमा (कर्णधार), कोझी, टोनी झोर्झी, एल्गार, हार्मेर, जेनसेन, क्लेसन, केशव महाराज, मापेम, मुल्डेर, एस. मुथ्थुस्वामी, किगेन पीटरसन, रबाडा आणि रिक्लेटोन.









