वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीसह उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांना मान्सूनच्या पावसाने झोडपून काढले आहे. दिल्लीत शनिवारी दुपारपासून जोरदार मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. हिमाचल प्रदेशात गेला आठवडाभर सतत वृष्टी होत असून आतापर्यंत 60 जणांचा बळी गेला आहे. या राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून अनेक खेड्यांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. उत्तराखंडमध्येही जलवृष्टीने मोठ्या प्रमाणात हानी झाली असून बचावकार्य केले जात आहे.
दिल्लीच्या भारत मंडपम्, अक्षरधाम मंदिर, सफदरजंग आणि कमल मंदिर या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार वृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून लोकांना सावध केले आहे. चांदणी चौक, दिल्ली विद्यापीठ उत्तर भाग, कुतुबमिनार, फरिदाबाद, नोयडा आदी भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 24 तासांपूर्वी संपूर्ण दिल्ली राजधानी क्षेत्राला यलो अलर्ट देण्यात आला होता. आता काही भागांमधील इशारा काढून घेण्यात आला आहे. यंदा दिल्लीत सरासरीपेक्षा अधिक वृष्टी आतापर्यंत झाली आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणाचा काही भाग आणि उत्तराखड, तसेच उत्तर प्रदेशचा उत्तर भाग येथेही जोरदार पाऊस होत असल्याचे वृत्त आहे.









