2 हजार 700 कोटींचा टप्पा पार
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये प्रवासी वाहतुकीत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. एकूण 2 हजार 755 कोटी रुपयांचा महसूल रेल्वेकडे जमा झाला असून, वक्तशीरपणात नैर्त्रुत्य रेल्वे देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. वर्षभरात 116 एक्स्प्रेसचा वेग वाढविला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार पुरेशा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलली. विभागाने पायाभूत सुविधा, विद्युतीकरण, रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण यासह इतर विकासकामे राबविल्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेच्या महसुलात वाढ झाली आहे. एकूण 24 एक्स्प्रेस सध्या विद्युत इंजिनाच्या साहाय्याने धावत आहेत. सुटीच्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मागणीनुसार 291 विशेष गाड्या सोडण्यात आल्या. एक्स्प्रेसला कायमस्वरुपी 253 डबे तर तात्पुरत्या स्वरुपात 224 डबे जोडण्यात आले. आर्थिक वर्षामध्ये एकूण 15.34 लाख प्रवाशांनी नैर्त्रुत्य रेल्वे विभागातून प्रवास केला असून, त्याद्वारे 2 हजार 755 कोटी रुपयांचा महसूल नैर्त्रुत्य रेल्वेकडे जमा झाला आहे. हा आजवरचा सर्वाधिक महसूल असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक हरिशंकर वर्मा म्हणाले, मागणीनुसार रेल्वे सोडल्याने प्रवाशांनी प्रतिसाद दिला. गेल्या आर्थिक वर्षात एकूण 2 हजार 330 डबे जोडल्याचे सांगितले. सरव्यवस्थापक संजीव किशोर यांनी रेल्वे प्रवाशांचे आभार मानले.









