गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचा घेतला आढावा
बेळगाव : बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड यांनी हुक्केरी तालुक्यातील वेगवेगळ्या गणेश मंडपांना भेट देऊन तेथील बंदोबस्ताची पाहणी केली. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे का? मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत का? याची त्यांनी पाहणी केली. यमकनमर्डी सारापूर गल्ली येथील श्री मंडपाला भेट देऊन डॉ. चेतनसिंग राठोड यांनी गणेशभक्तांशी संवाद साधला. या मंडपात आरतीसाठी हिंदूंबरोबरच मुस्लीम बांधवही जमले होते. जातीय
सलोख्याचे दर्शन घडवतानाच यमकनमर्डीत हिंदू व मुस्लीम बांधव एकदिलाने उत्सव साजरा करीत आहेत, याचा आपल्याला आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर आदी पोलीस अधिकारीही उपस्थित होते. हुक्केरी व यमकनमर्डी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातील अनेक गणेश मंडळांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या उत्तर विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेटी देऊन बंदोबस्ताच्या तयारीची ते पाहणी करीत आहेत.









