चौघांचा मृत्यू : रात्रीच्या वेळी घडलेल्या दुर्घटनेनंतर हाहाकार : तपासाचे आदेश
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्थानकाजवळ बुधवारी रात्री 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस (ईशान्य) ऊळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना घडली. रेल्वेचा ट्रॅक खराब झाल्याने बुधवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास या एक्स्प्रेसचे सर्व 24 डबे ऊळावरून घसरल्याचे सांगण्यात आले. 24 पैकी आठ बोगी पूर्णपणे कोसळल्या होत्या. या आठ बोगींपैकी दोन बोगी एकमेकांवर आदळल्यामुळे त्यातील आई-मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सुमारे 200 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी 70 जण गंभीर आहेत. बक्सरमधील घटनास्थळी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक लोकांकडून मदत व बचावकार्य राबविण्यात आले. आनंद विहार टर्मिनसहून कामाख्याकडे जाणाऱ्या टेन क्रमांक 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला 11.10.2023 रोजी रात्री 9.53 वाजता दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ अपघात झाला. यामध्ये टेनचे 23 डबे ऊळावरून घसरले. या दुर्दैवी घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाने प्रत्येकी 10 लाख ऊपयांची मदत दिली आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना प्रत्येकी 50 हजार ऊपये मदत म्हणून देण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तसेच हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योग्य तपासाअंती अपघाताचे कारण समोर येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपघातानंतर लगेचच आसपासच्या गावातील लोक मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. अंधारामुळे बॅटरीच्या प्रकाशात प्रथम बचावकार्य करण्यात आले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमसह पाटणा, आराह आणि बक्सर येथून रेल्वे बचाव पथकही मध्यरात्री पोहोचले होते. या घटनेनंतर पाटणा जंक्शनवर हेल्पलाईन काउंटर सुरू करण्यात आले. या अपघातामुळे सदर मार्गावरून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला आहे. भारतीय रेल्वेने या मार्गावरून जाणाऱ्या सुमारे 18 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. यानंतर पाटणा जंक्शनवर लोकांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दीपक भंडारी यांच्या पत्नी उषा भंडारी (33), त्यांची मुलगी आकृती भंडारी (8) यांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंब आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्या जंक्शनला जात होते. दीपक स्वत: आणि त्यांची दुसरी मुलगी आदिती या अपघातातून बचावले आहेत. याशिवाय किशनगंजचा रहिवासी अबू जाहिद (27) आणि राजस्थानचा रहिवासी नरेंद्र कुमार यांचाही मृत्यू झाला.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
बिहारमध्ये रेल्वे अपघाताची अत्यंत दु:खद घटना घडली आहे. बाबा ब्रह्मेश्वर नाथांच्या कृपेने एवढी मोठी घटना घडूनही अनेकांचे प्राण वाचले. तरीही चार जणांचा मृत्यू अत्यंत दु:खद असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी सांगितले. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. मी सातत्याने रेल्वेमंत्री आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जनतेने दिलेल्या प्रचंड सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. रात्रीपासूनच स्थानिक लोक मदत आणि बचावकार्यात गुंतले होते. पीडित कुटुंबाला योग्य नुकसान भरपाई दिली जाईल, असेही ते पुढे म्हणाले.









