किम जोंग उन यांची अमेरिका, जपान, दक्षिण कोरियाला धमकी
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेच्या विरोधात पुन्हा संताप व्यक्त केला आहे. हे देश उत्तर कोरियाला कमकुवत करण्यासाठी स्वत:ची सैन्यभागीदारी वाढवत आहेत. अशास्थितीत उत्तर कोरिया स्वत:च्या आण्विक अस्त्र कार्यक्रमाला मजबूत करेल, जेणेकरून कुठल्याही संभाव्य धोक्याला सामोरे जाता येईल असे उद्गार किम यांनी काढले आहेत.
उत्तर कोरियाचा दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानसोबत तणाव आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियासोबत संबंध सुधारण्याचे संकेत दिले असताना किम यांनी हे वक्तव्य केले आहे. किम यांनी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सैन्य सहकार्याची निंदा करत याला क्षेत्रीय तणाव वाढविणारा घटक ठरविले आहे.
अमेरिकेकडून अण्वस्त्रांची तैनात, संयुक्त युद्धाभ्यास अणि जपान-दक्षिण कोरियाच्या सैन्य सहकार्यामुळे क्षेत्रात सैन्य संतुलन बिघडत आहे. हा प्रकार आमच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकतो. अशास्थितीत आम्ही याच्या प्रत्युत्तरादाखल आम्ही सर्व संभाव्य पावले उचलू. या पावलांमध्ये आण्विक क्षमतेचा विस्तार देखील सामील असल्याचे किम यांनी म्हटले आहे.
तणाव इच्छित नाही, परंतु..
आमचा देश क्षेत्रीय तणाव इच्छित नाही, परंतु क्षेत्रीय सैन्य संतुलन सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलणार आहे. आमचे सैन्य आणि लोक रशियाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडत्वाच्या रक्षणासाठी रशियनन सैन्य आणि लोकांसोबत न्यायसंगत कारणाचे समर्थन करेल अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.









