पर्यावरणी फाऊंडेशनतर्फे वनमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन : राज्य सरकारने फेरविचार करून म्हादईचे पाणी वळवणे त्वरित थांबवावे
बेळगाव : म्हादई नदीचे पाणी वळविल्यास केवळ भीमगड अभयारण्य नाही तर संपूर्ण उत्तर कर्नाटकाला फटका बसणार आहे. भीमगड अभयारण्यात उगम पावणाऱ्या मलप्रभा नदीमुळे उत्तर कर्नाटकात पाण्याचा साठा आहे. नवलतीर्थ येथील धरणात येणारे 80 टक्के पाणी हे खानापूर तालुक्मयातील पावसाचे पाणी असल्याने म्हादई नदीचे पाणी वळवणे त्वरित थांबवावे, अशी मागणी पर्यावरणी फाउंडेशनच्यावतीने कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तिओली, तालुका खानापूर येथे पर्यावरणी फाउंडेशनच्या सदस्यांनी मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना म्हादई नदीच्या पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली. 1997 ते 2011 या पंधरा वर्षांच्या कालावधीत खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या प्रदेशाला वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित करण्यासाठीची माहिती गोळा करून ती राज्य व भारत सरकारला पाठवून दिली होती. खानापूर तालुका हा मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. मलप्रभा नदीच्या पाण्यावर खानापूर तालुका हिरवागार आहे.
मलप्रभा नदीवर बांधलेल्या नवलतीर्थ धरणात 80 टक्के पाणी हे खानापूर तालुक्यातूनच जाते. म्हादई नदीचे पात्र बदलल्यास उत्तर कर्नाटकातील बेळगावसह हुबळी-धारवाड, नरगुंद, नवलगुंद, रामदुर्ग व गदग या परिसराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पामुळेही वन्यजीव अभयारण्याला मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने याचा फेरविचार करून म्हादईचे पाणी वळवणे त्वरित थांबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कॅप्टन नितीन धोंड, नायला कोयलो, कर्नल रवींद्र सैनी, गीता साहू, सुजित मुळगुंद, राजू टोपण्णावर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.









