वृत्तसंस्था / कोलकाता
येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर शनिवारी झालेल्या 134 व्या ड्युरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी संघाने सलग दुसऱ्यांदा पटकाविले. शनिवारच्या अंतिम सामन्यात नॉर्थइस्ट युनायटेडने या स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण केलेल्या डायमंड हार्बर एफसी संघाचा 6-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
या सामन्यात नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी संघातर्फे आशिर अख्तर, प्रतिभ गोगोई, थोई सिंग, जेरो, गेटान आणि अॅलेडेनी अॅजेरी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तर डायमंड हार्बर एफसीतर्फे एकमेव गोल लुका मॅजेसनने नोंदविला. ड्यूरँड चषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासामध्ये पाठोपाठ दोनवेळा विजेतेपद मिळविणारा नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी हा बारावा संघ आहे. 2024 च्या हंगामातील झालेल्या ड्यूरँड चषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी संघाने बलाढ्या मोहन बागानचा अंतिम सामन्यात पराभव करुन विजेतेपद मिळविले होते. शनिवारच्या अंतिम सामन्यात एकूण दोन्ही संघांकडून 7 गोल नोंदविले गेले. पण नॉर्थ इस्ट युनायटेड संघाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर डायमंड हार्बरवर 6 गोल नोंदविले. नॉर्थ इस्ट युनायटेड एफसीने 2025 च्या हंगामातील झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बोडोलँड एफसीचा 4-0 तर त्यानंतर उपांत्य सामन्यात शिलाँग लेजॉंग एफसीचा निसटता पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. तर या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर क्लबने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जमशेदपूर एफसीचा 2-0 तर उपांत्य सामन्यात इस्ट बंगालचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली होती.









