वृत्तसंस्था / भुवनेश्वर
कलिंगा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी आणि जमशेदपूर एफसी संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. नॉर्थ इस्ट युनायटेडने मोहमेडन स्पोर्टिंगचा तर जमशेदपूरने हैद्राबाद एफसीचा पराभव केला.
मोहमेडन स्पोर्टिंग आणि नॉर्थ इस्ट युनायटेड यांच्यातील सामना एकतर्फी झाला. या सामन्यात नॉर्थ इस्ट युनायटेड संघातील मोरोक्कोचा फुटबॉलपटू अॅलेडिने अॅजेरीने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली. त्याने या सामन्यात 18 व्या, 57 व्या आणि 92 व्या मिनिटाला असे तीन गोल केले. नॉर्थ इस्ट युनायटेडतर्फे एम. एस. जितीनने तिसऱ्या मिनिटाला, नेस्टर रॉजरने 42 व्या आणि जी. हिरोने 66 व्या मिनिटाला असे गोल नोंदविले. मोहमेडन स्पोर्टिंगलाया सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. नॉर्थ इस्ट युनायटेडने हा सामना 6-0 अशा गोलफरकाने जिंकला.
दुसऱ्या सामन्यात जमशेदपूर एफसीने हैद्राबाद एफसीचा 2-0 असा फडशा पाडला. या सामन्यात जमशेदपूर संघातर्फे झेवियर सिव्हेरोने 39 व्या मिनिटाला तर स्टिफन इझेने 64 व्या मिनिटाला गोल केले.









