वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात उत्तर विभागाने नॉर्थ-ईस्ट विभागाचा 511 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उत्तर विभागाच्या निशांत सिंधूला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात उत्तर विभागाने आपला पहिला डाव 8 बाद 540 धावावर घोषित केला. निशांत सिंधूने 150, ध्रुव शोरेने 135 तर हर्षित राणाने नाबाद 122 धावा झळकविल्या. त्यानंतर नॉर्थ-इस्टचा पहिला डाव 39.2 षटकात 134 धावात आटोपला. उत्तर विभागातर्फे सिद्धार्थ कौल आणि पुलकित नारंग यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. उत्तर विभागाने आपला दुसरा डाव 6 बाद 259 धावावर घोषित नॉर्थ-इस्ट विभागाला निर्णायक विजयासाठी 666 धावांचे कठीण आव्हान दिले. उत्तर विभागाच्या दुसऱ्या डावात प्रभसिमरन सिंगने 59, अंकितकुमारने 70 तर अंकित कालसीने 49 धावा जमवल्या. नॉर्थ-इस्ट विभागाने 3 बाद 58 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाच्या शेवटच्या दिवसाला प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 47.5 षटकात 154 धावात आटोपला. उत्तर विभागातर्फे पुलकित नारंगने 43 धावात 4 तर निशांत सिंधूने 25 धावात 2 गडी बाद केले. नॉर्थ-इस्टच्या दुसऱ्या डावामध्ये पालझरने 1 षटकार आणि 4 चौकारासह 40 तर निलेशने 4 चौकारासह 27 धावा जमवल्या.
संक्षिप्त धावफलक : उत्तर विभाग प. डाव 8 बाद 540 डाव घोषित, नॉर्थ-इस्ट प. डाव 39.2 षटकात सर्व बाद 134, उत्तर विभाग दु. डाव 6 बाद 259 डाव घोषित, नॉर्थ-इस्ट दुसरा डाव 47.5 षटकात सर्व बाद 154 (नारंग 4-43, निशांत सिंधू 2-25).









