मंत्री प्रियांक खर्गे यांचा आरोप : ‘आळंद’ मतचोरीवरून आयोगाशी वाद सुरूच
प्रतिनिधी/ बेंगळूर
आळंद मतदारसंघातील मतचोरीवरून काँग्रेस नेत्यांचा निवडणूक आयोगाशी वाद सुरूच आहे. सीआयडी तपासासाठी आवश्यक माहिती न देता निवडणूक आयोग खोटे बोलत आहे. तसेच तपासात असहकार करत आहे, असा आरोप ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी मंत्री प्रियांक खर्गे आणि आमदार बी. आर. पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आयोगासमोर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना, निवडणूक आयोगाने 6 सप्टेंबर 2023 रोजी कलबुर्गी जिल्ह्याच्या एसपींना चौकशीसाठी आवश्यक असलेली माहिती देण्यात आली आहे, असे स्पष्ट केले होते.
मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी सादर केलेल्या अर्जावर आक्षेप घेणाऱ्यांची माहिती, अनुक्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, लॉगिनसाठी वापरलेला मोबाईल क्रमांक, प्रक्रियेसाठी दिलेला मोबाईल क्रमांक, आयपी पत्ता, अर्जदाराचे ठिकाण, अर्ज सादर करण्याची तारीख आणि वेळ, वापरकर्त्याचे लॉगिन तयार करण्याची तारीख आदी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, कर्नाटक राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासासाठी आवश्यक असलेली इतर माहिती प्रदान केली आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.
प्रियांक खर्गे यांनी सदर स्पष्टीकरण नाकारले असून आयोग स्पष्टपणे खोटे बोलत आहे. कर्नाटक राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 14 मार्च 2025 रोजी एक निवेदन लिहिले असून यात त्यांनी बी. आर. पाटील यांची तक्रार आणि एडीजीपी कायदा आणि सुव्यवस्थेचे पत्र यासह 17 पत्रव्यवहारांची माहिती नमूद केली. जर सर्व कागदपत्रे 2023 मध्ये प्रदान केली गेली असतील तर राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 2025 मध्ये निवेदन लिहून माहिती देण्याची परवानगी का मागितली?, असा प्रश्नही उपस्थित केला.









