10 लाख टनापेक्षा अधिक साठ्याच्या निर्यातीला सरकारची मंजुरी : अधिसूचना जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने नेपाळ, कॅमेरून आणि मलेशिया समवेत 7 देशांना 10,34,800 टन बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाकडून (डीजीएफटी) बुधवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड (एनसीईएल)कडूनच केली जाऊ शकते.
भारताने देशांतर्गत मागणी अन् दर विचारात घेत 20 जुलैपासून बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु काही देशांच्या अन्नसुरक्षेची गरज पाहता केंद्र सरकार त्यांच्यासाठी बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीला अनुमती देत आहे. भारतातील तांदळाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या या निर्णयानंतर अनेक देशांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच जागतिक स्तरावर तांदळाचे दर वाढले होते.
केंद्र सरकारने नेपाळ, कॅमेरून, कोटे डी आयवर, गिनी, मलेशिया, फिलिपाईन्स आणि सेशेल्सला बिगरबासमरी तांदळाची निर्यात करण्याची अनुमती दिली आहे. या अधिसूचनेनुसार नेपाळला 95 हजार टन, कॅमेरूनला 1 लाख 90 हजार टन, कोटे डी आयवरला 1 लाख 42 हजार टन, गिनीला 1 लाख 42 हजार टन, मलेशियाला 1 लाख 70 हजार टन, फिलिपाईन्सला 2 लाख 95 हजार टन आणि सेशेल्सला 800 टन बिगरबासमती तांदळाची निर्यात केली जाणार आहे.
नेपाळने भारताला बिगरबासमती तांदळाच्या निर्यातबंदीतून स्वत:ला वगळण्याची विनंती केली होती. नेपाळ हा प्रामुख्याने भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळावर अवलंबून आहे. तसेच अन्य काही देशांकडून भारताला बिगरबासमती तांदळाची निर्यात सुरू करण्याची विनंती करण्यात येत आहे.









