वसुंधरा राजेंच्या निकटवर्तीयाची निराशा
राजस्थान भाजपने स्वत:च्या उमेदवारांची पाचवी यादी जारी केली आहे. या यादीत एकूण 15 उमेदवारांची नावे आहेत. कोलायत मतदारसंघातील उमेदवार भाजपने बदलला आहे. पूर्वी या मतदारसंघात पक्षाचे दिग्गज नेते देवी सिंह भाटी यांची सून पूनम कंवरला उमेदवारी देण्यात आली होती, परंतु आता त्यांच्या जागी देवी सिंह भाटी यांचे नातू अंशुमान सिंह भाटी हे पक्षाचे उमेदवार असणार आहेत. अमित चौधरी यांना हनुमानगढ मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. तर राधेश्याम बैरवां हे बाराच्या अटरू मतदारसंघात भाजपचे उमेदवार असतील. भरतपूर मतदारसंघात विजय बन्सल, राजखेरा येथे नीरजा अशोक वर्मा यांना तिकीट मिळाले आहे.
शाहपुरामध्ये उपेन यादव
सिविल लाइन मतदारसंघाचे दावेदार माजी मंत्री अरुण चतुर्वेदी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. चतुर्वेदी हे वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या मतदारसंघात भाजपने नव्या चेहऱ्याला संधी देत पत्रकार गोपाळ शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शर्मा यांच्यासमोर राजस्थान सरकारमधील दिग्गज मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांचे आव्हान असणार आहे. तर वसुंधरा राजे यांचे निष्ठवंत असलेले अशोक परनामी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. तर बेरोजगार युवक संघाचे अध्यक्ष उपेन यादव यांना शाहपुरा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. कोटा उत्तर मतदारसंघात वसुंधरा राजे समर्थक प्रल्हाद गुंजल यांना संधी मिळाली आहे.
उपेन यादव कोण?
बेरोजगार युवांच्या मुद्द्यावर राज्य सरकारला घेरणारे उपेन यादव यांनी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. उपेन यादव यांच्या एका हाकेवर राज्यातील हजारो बेरोजगार एकत्र होत असतात. मागील 11 वर्षांपासून युवा बेरोजगारांसाठी दोन्ही पक्षांच्या सरकारांसोबत संघर्ष केला आहे. या संघर्षानंतरच सरकारमध्ये युवांची भागीदारी असायला हवी असा निष्कर्ष काढला असल्याचे उपेन यांनी सांगितले आहे.
भाजपकडून 199 उमेदवार घोषित
राजस्थान विधानसभेत एकूण 200 जागा असून भाजपने आतापर्यंत 199 उमेदवार घोषित केले आहेत. यापूर्वी पक्षाने शुक्रवारी उमेदवारांची यादी जारी केली हाहेती. पक्षाने यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष कैलास मेघवाल यांना उमेदवारी नाकारली आहे. तसेच धर्मगुरु बालमुकुंदाचार्य यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. याऐवजी भाजपने स्वत:चे अनेक खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.
एका टप्प्यात मतदार
राजस्थानातील विधानसभा निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे. पूर्वी 23 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान होणार होते, परंतु आता 25 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.









