ऑक्टोबरपासूनच दुष्काळाचे चटके : चाराटंचाई तीव्र : मेंढपाळांचे हाल : उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता
बेळगाव : पावसाअभावी ऑक्टोबर महिन्यापासूनच चाराटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. विशेषत: चाऱ्यासाठी मेंढपाळांची रानोमाळ भटकंती सुरू झाली आहे. काही ठिकाणी मेंढपाळांनी स्थलांतर केले आहे. परिणामी काही मेंढपाळांना चाऱ्याअभावी झाडांचा पाला घालून गुजराण करावी लागत आहे. त्यामुळे शेळ्या, मेंढ्यांसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मेंढपाळांतून होत आहे. यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे ओल्या आणि सुक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पशुसंगोपन खात्याने जिल्ह्यात 16 लाख टन चारासाठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात चाऱ्यासाठी मेंढपाळांची धडपड दररोज सुरू असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक पाळीव जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये 13 लाख बैल, म्हशी आणि गायी तर 14 लाख शेळ्या-मेंढ्यांची संख्या आहे. या जनावरांचा आता चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होवू लागला आहे.
मेंढपाळांवर स्थलांतराची वेळ
पावसाअभावी भात, सोयाबीन, भुईमूग, कापूस, बटाटा आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ओला चाऱ्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. विशेषत: सौंदत्ती, बैलहोंगल, रायबाग तालुक्यात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मेंढपाळांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. विशेषत: पावसाच्या तोंडावर स्थलांतर होते. मात्र यंदा चाऱ्याअभावी ऑक्टोबरमध्येच मेंढपाळांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. पशुसंगोपन खात्याने चारा छावण्या निर्माण करून दिलासा द्यावा, अशी मागणीही मेंढपाळांतून होवू लागली आहे.
बागलकोट, विजापूर, गदग जिल्ह्यातील मेंढपाळ बेळगावात
यंदा परतीचा पाऊस देखील झाला नाही. त्यामुळे नवीन चाऱ्याची उगवण झाली नाही. परिणामी बरेचसे क्षेत्र पडीक राहिले आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण स्वरुप धरण करू लागला आहे. विशेषत: पशुपालक, मेंढपाळ आणि इतर पशुधनावर अवलंबून असणाऱ्यांना फटका बसू लागला आहे. बागलकोट, विजापूर, गदग जिल्ह्यातील मेंढपाळ बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये दाखल होवू लागले आहेत. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील डोंगर परिसरात शेळ्या-मेंढ्यांचे कळप येवू लागले आहेत.
येत्या काळात भीषण चाराटंचाई
चिकोडी, रायबाग, हुक्केरी, गोकाक तालुक्यात ऊस तोडणीला प्रारंभ झाला की, काहीसा ओला चारा निर्माण होतो. मात्र यंदा ओल्या चाऱ्याचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील जनावरांना दर आठवड्याला 67 हजार टन चारा लागतो. दरम्यान पशुसंगोपनने 16 लाख टन चारा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात भीषण चाराटंचाई निर्माण होणार आहे.
सरकारने चारासाठा करावा
यंदा पाऊस झाला नसल्याने खुल्या माळरानावर मेंढरांना चारा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे भटकंती करावी लागत आहे. आतापासूनच चाऱ्यासाठी धडपड सुरू झाली आहे. सरकारने उपाययोजना कराव्यात. दररोज 200 मेंढरांचा कळप घेवून चारा पाण्यासाठी फिरावे लागत आहे.
– वैजू नरोटी, मेंढपाळ
जनावरांच्या चाऱ्याची चिंता नाही
जिल्ह्यात एकूण 16 लाख टन चारासाठा शिल्लक आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची चिंता नाही. डिसेंबरनंतर चाराटंचाई निर्माण झाल्यास चारा छावण्या सुरू केल्या जातील. इतर जिल्ह्यांमध्ये देखील दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
– राजीव कुलेर, सहसंचालक पशुसंगोपन खाते









