वृत्तसंस्था / स्टॉकहोम
भौतिकशास्त्र या विषयाचे यंदाचे नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांनी पटकाविले आहे. त्यांची नावे पेरी ऑगोस्तिनी, फेरेंक क्रूझ आणि अॅनी एलहुईलिअर अशी आहेत. वस्तूमानातील इलेक्ट्रॉन्सच्या हालचालींचे स्वरुप असे असते यावर प्रकाश टाकल्यासंदर्भात त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉन हा विश्वातील सर्वात सूक्ष्म कण मानला जातो. त्याचे स्थान अणू आणि रेणूंमध्ये असते. या शास्त्रज्ञांनी या इलेक्ट्रॉनसंबंधी महत्वाचे संशोधन करुन त्याची नवी रहस्ये शोधून काढली आहेत. त्यासाठी त्यांनी अनेकविध प्रयोग केले असून नव्या उपकरणांचीही निर्मिती केली आहे. यामुळे इलेक्ट्रॉनसंबंधी ज्ञानाची नवी द्वारे उघडली गेली आहेत, असे नोबेल पुरस्कार समितीने स्पष्ट केले आहे.
संशोधनाचा उपयोग काय…
या तीन शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा मानवतेला अनेक क्षेत्रांमध्ये उपयोग होणार आहे. प्रकाशाचे अतिलघु तरंग निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी तशी अत्याधुनिक उपकरणे निर्माण केली आहेत. या तरंगांच्या साहाय्याने वस्तूमानातील इलेक्ट्रॉन्स कशा प्रकारे हालचाल करतात तसेच ते कशाप्रकारे ऊर्जेचे परिवर्तन करतात यांचे मापन करता येणार आहे. हे अतिवेगवान पद्धतीने होत असल्याने अचूक परिणाम त्यांच्यापासून प्राप्त होतात. यापूर्वी अशा वेगवान पद्धतीने हे मापन होत नव्हते. इलेक्ट्रॉन्सच्या हालचालींची छायाचित्रे काढणेही त्यामुळे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकशास्त्र, संगणक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी साधनांमध्ये शक्य आहे, अशी माहिती देण्यात आली.
संयुक्त आणि स्वतंत्र योगदान
या संशोधनात या तीन्ही शास्त्रज्ञांचे संयुक्त, तसेच स्वतंत्र योगदान आहे. एलहुईलिअर यांनी वायूमधील अणूंवर लासर किरणांची परिणाम कसा होते हे यशस्वीरित्या दर्शवून दिले. या परिणामाचा उपयोग प्रकाशाचे अतिलघु तरंग निर्माण करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे अॅगोस्टीनी आणि क्रूझ यांनी सिद्ध केले आहे. भविष्यात हे नवे तंत्रज्ञान अनेक क्षेत्रांमध्ये दिशादर्शक ठरेल. त्यामुळे या शास्त्रज्ञांनी केलेले हे कार्य मोलाचे ठरते, असे नोबेल समितीने प्रतिपादन केले.
आज रसायनशास्त्र पुरस्कार
आज बुधवारी नोबेल समिती रसायनशास्त्रातील यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करणार आहे. गुरुवारी साहित्यातील नोबेल पुरस्कारची घोषणा होईल. त्यानंतर शुक्रवारी नोबेल विश्वशांती पुरस्कार घोषित केला जाईल आणि शनिवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार घोषित केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.









