जॉन फॉस्से ठरले मानकरी : आज शांतता पुरस्काराची घोषणा
वृत्तसंस्था /स्टॉकहोम
नॉर्वेस्थित लेखक जॉन फॉस्से यांना 2023 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांच्या नाटकांसाठी आणि गद्य लेखनासाठी जाहीर झाला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण शैलीसाठी फॉस्से यांना पुरस्कार देण्यात येत असल्याचे गुरुवारी स्विडिश अकादमीने जाहीर केले आहे. अकादमीचे स्थायी सचिव मॅट्स माल्म यांनी गुऊवारी स्टॉकहोममध्ये नोबेल पुरस्कार विजेत्याची घोषणा केली. यावषीचे साहित्यिक पारितोषिक विजेते जॉन फॉस्से ‘फॉस्से मिनिमलिझम’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैलीत कादंबरीलेखन करतात. त्यांची ही शैली ‘स्टेंज्ड गिटार’ (1985) या कादंबरीमध्ये दिसून येते. यापूर्वीचा 2022 सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एरनॉक्स यांना देण्यात आला होता. त्या फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे साहित्यिक कार्य बहुतेक आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे. आतापर्यंत 2023 साठीच्या चार क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले असून शांततेचा नोबेल शुक्रवारीच जाहीर होणार आहे. शांतता नोबेल पुरस्कार विजेत्याचे नाव ऐकण्यासाठी जगाचे लक्ष स्टॉकहोमकडे लागलेले आहे.









