अमेरिकन अर्थव्यवस्थेत महिलांच्या योगदानावर संशोधन
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापक क्लॉडिया गोल्डीन यांची यंदाच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. क्लॉडिया गोल्डीन ह्या जगातील दहा सर्वात प्रभावशाली महिला अर्थशास्त्रज्ञांपैकी एक मानल्या जातात. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील स्त्रियांच्या भूमिकेवरील त्यांचे संशोधन खूप गाजले. क्लॉडिया यांनी स्त्री-पुऊषांच्या वेतनातील तफावतीची कारणे समजून घेण्यासाठीही बरेच संशोधन केले आहे.

क्लॉडिया गोल्डीन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. महिला श्र्रमिक मार्केटच्या परिणामांबद्दल ज्ञान विकसित करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रॉयल स्विडिश अॅपॅडमी ऑफ सायन्सेसने सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. श्र्रमिक बाजारपेठेतील महिलांची भूमिका समाजाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. क्लॉडिया गोल्डीन यांच्या संशोधनाद्वारे आपण महिलांना अडथळा आणणाऱ्या घटकांबद्दल जाणून घेऊ शकतो आणि भविष्यात या अडथळ्यांवर मात करू शकतो, असे इकॉनॉमिक सायन्सेस पुरस्कार समितीचे अध्यक्ष जेकब स्वेन्सन यांनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करताना स्पष्ट केले आहे.
क्लॉडिया गोल्डीन हा पुरस्कार जिंकणाऱ्या केवळ तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी सन्मानित करण्यात आलेल्या 92 अर्थशास्त्र पुरस्कार विजेत्यांपैकी केवळ दोन महिलांना हा पुरस्कार देण्यात आला होता. क्लॉडिया गोल्डीन हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी शतकानुशतके महिलांची कमाई आणि श्र्रमिक बाजारातील सहभागाचा सर्वसमावेशक लेखाजोखा प्रदान करण्याचे काम केले आहे. त्यांच्या संशोधनातून बदलाची कारणे आणि उरलेल्या लिंग अंतराचे मुख्य स्त्रोत उघड झाले.
गोल्डीन यांनी 200 वर्षांहून अधिक वर्षांचा डेटा गोळा करून महिलांची कमाई आणि रोजगार दरांमधील लैंगिक अंतर कसे आणि का बदलले हे सिद्ध केले. जागतिक श्र्रम बाजारात महिलांचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे आणि जेव्हा त्या काम करतात तेव्हा त्या पुऊषांपेक्षा कमी कमावत असल्याचे त्यांच्या संशोधनातून दिसून आले आहे. 1970 च्या दशकात अमेरिकेत महिलांच्या हक्कांसाठी चळवळ सुरू करत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील महिलांच्या सहभागाचा अभ्यास केला. त्यांच्या संशोधन आणि चळवळीतूनच पुढे स्त्रियांच्या भूमिकेबद्दल लोकांचे विचार बदलत होते.
क्लॉडिया गोल्डीन यांचा जन्म 1946 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला होता. मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयात त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी 1972 मध्ये शिकागो विद्यापीठातून इंडस्ट्रियल आणि लेबर इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टरेट केली. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे 2007-2008 मध्ये अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत झाली होती.









