वृत्तसंस्था/ चंदीगढ
हरियाणातील नूह परिसरात आयोजित करण्यात आलेली जलाभिषेक यात्रा कोणत्याही परिस्थित काढण्यात येईल, असा निर्धार विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केला आहे. या यात्रेला अनुमती देण्यात आलेली नाही. भाविकांनी त्यांच्या घरांजवळच्या मंदिरांमध्ये जलाभिषेक करावा, अशी सूचना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली होती. मात्र, अनुमती नसली तरी यात्रा काढली जाईल, असे विहिंपने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली.
तणाव वाढेल असे कृत्य कोणीही करु नये. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. ते योग्य रितीने पार पाडले जाईल. सर्वसामान्यांनीही यासंदर्भात सरकारला सहकार्य करावे. काही दिवसांपूर्वी नूहमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लीम असा संघर्ष पेटला होता. तशी परिस्थिती आता निर्माण होऊ नये यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विहिंपच्या या यात्रेला या भागात प्रबळ असणाऱ्या सर्व हिंदू समाज या संघटनेचा पाठिंबा आहे. दंगलीत हिंदू समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यामुळे हिंदू समाजाचा आत्मविश्वास वाढवा यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्टीकरण या दोन्ही संघटनांनी दिले. हिंदूंचा अवमान करण्याचा किंवा त्यांच्या भावना भडकाविण्याचा उद्योग कोणी करु नये. तसे केल्यास परिणाम गंभीर होण्याची शक्यता आहे, असा इशाराही या दोन्ही संटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला.









