गेल्या आठवड्यात चार दिवस खंडित झाला होता
इचलकरंजी : पाटील मळा परिसरात आठ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने महिलांनी संताप व्यक्त करत मंगळवारी सकाळी सांगली रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शाळा सुरू होण्याची वेळ असल्याने विद्यार्थी, पालकांना अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मन:स्ताप सहन करावा लागला.
कृष्णा उपसा योजनेच्या उपसा केंद्राचा वीजपुरवठा गेल्या आठवड्यात चार दिवस खंडित झाला होता. त्यामुळे शहरात पाण्याची मोठी तूट निर्माण झाली आहे. नियमित पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दोन दिवस आड पाणी देण्याची योजना असली तरी अनेक भागात सात दिवस उलटूनही नळाला पाणी आलेले नाही. विशेषत: पाटील मळा परिसरात एकदाही पाणी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
सकाळी महिलांनी घागरी–बादल्या घेऊन फॉर्च्युन प्लाझा मॉलजवळ सांगली रोडवर बसून आंदोलन छेडले. सांगली रोड वर्दळीचा मार्ग असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शाळा आणि महाविद्यालयांकडे जाणाऱ्या विद्यार्थी, पालकांची मोठी तारांबळ उडाली.
दरम्यान, राहूल गाट आणि राजू आलासे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आमदार राहुल आवाडे आणि महापालिकेचे शाखा अभियंता बाजी कांबळे यांच्याशी चर्चा घडवून आणली. पाटील मळा परिसरात खोदलेली कूपनलिका पाणी नसल्यामुळे बंद आहे.
त्यामुळे नागरिक पूर्णपणे नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. यावर तोडगा म्हणून तातडीने कूपनलिकेची सुविधा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या महिलांच्या या आंदोलनानंतर महिलांनी रास्ता रोको मागे घेतला. त्यानंतर या भागात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आला.








