पाणीटंचाईमुळे शहरातील एका शाळेने चक्क सुटी जाहीर करण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
पाऊस लांबत चालला आहे, तशी चिंता वाढत आहे. पाण्याचे संकट भेडसावू लागले आहे. पाणीटंचाईमुळे शहरातील एका शाळेने चक्क सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. परंतु याबाबत बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया येवू लागल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला.
दरवर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर मुलांच्या हिताचा विचार करून प्रशासन शाळांसाठी सुटी जाहीर करते. परंतु शहराच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाईचा विचार करून शाळेला सुटी देण्याचा विचार होऊ लागला आहे. शाळेतील मुलांना हात धुण्यासाठी तसेच स्वच्छतागृहासाठी पाण्याची गरज भासते. परंतु तेवढा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या पाण्याची सोय करणे शाळांना शक्य नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे.
टँकरचे पाणी सर्वच शाळांना परवडते असे नाही. शिवाय टँकरचे पाणी मुलांना पिण्यासाठी देण्याबाबत उच्चप्रतिष्ठित शाळांचे पालक तयार नाहीत. दरम्यान या शाळा विद्यार्थ्यांच्या फी स्वरुपात व डोनेशन स्वरुपात भरमसाट शुल्क घेतात. परंतु मुलांच्या प्राथमिक गरजा भागवू शकत नाहीत. याबद्दल पालकांनीच नाराजी व्यक्त केली. केवळ याच कारणास्तव शाळांना सुटी जाहीर करणे, याला पालकांनी आक्षेप घेतला. परिणामी शाळेला पुन्हा आपला निर्णय मागे घेणे भाग पडले.
दरम्यान या प्रकाराची समाज माध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरू झाली व बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळेने मागे घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती नसल्याने त्यांनी सुटी समजून घरी राहणे पसंत केले. परंतु शाळेने नेहमीप्रमाणे वर्ग घेतल्याचे पालकांना लक्षात येताच त्यांनी एकूणच या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
‘करिक्युलर अॅक्टीव्हीटीज’च्या नावाखाली शाळा विद्यार्थ्यांना अनेक प्रकल्प राबविण्यास सांगतात. वास्तविक ते बरेच खर्चीक असतात. पण पालकच त्या विरोधात बोलत नसल्याने शाळांना त्यामध्ये बदल करावासा वाटत नाही. यंदा उद्भवलेल्या पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन शाळांनी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ चा प्रयोग राबविणे ही काळाची गरज आहे. सर्व विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी सहभागी करून घेतल्यास विद्यार्थ्यांनाही पाण्याचे महत्त्व लक्षात येवू शकते. फक्त त्यासाठी शाळा पुढकार घेणार का? हा प्रश्न आहे.
सुटी जाहीर करण्याचा निर्णय परस्पर घेता येत नाही
याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांच्याशी संपर्क साधला असता, शाळांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय परस्पर घेता येत नाही. शाळा व्यवस्थापनाने आमच्या निदर्शनास ही बाब आणून देणे आवश्यक आहे. हे व्यवस्थापनाने लक्षात घ्यायला हवे. एकाच शाळेला पाणीटंचाई जाणवत असेल तर त्या शाळेने पर्यायी व्यवस्था करणे भाग आहे. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
पर्यायी व्यवस्था करा
शाळेने सुटीसाठी परवानगी मागितली होती. परंतु एकाच शाळेसाठी असा नियम करणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, असे आपण सांगितले. अशी माहिती शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी दिली.









