लुला दा सिल्वा यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले आहे. ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये. आम्ही सभ्य असून कोणाच्याही ओरडण्याला घाबरत नाही, असा इशारा सिल्वा यांनी ट्रम्प यांना दिला. आम्ही अमेरिकन सरकारसमोर झुकणार नाही. जैर बोल्सोनारो यांच्याशी संबंधित खटला हा ब्राझीलचा अंतर्गत मुद्दा असून तो आम्ही हाताळू. बोल्सोनारो यांच्यासोबत काहीही चुकीचे घडत नाहीये, उलट लोकशाही त्यांना न्याय देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्यावरील खटल्याचे वर्णन राजकीय शिक्षा म्हणून केले. तसेच ब्राझीलला अयोग्य भागीदार असे संबोधत त्यांच्या निर्यातीवर 50 टक्क्यांपर्यंत कर लावण्याची आणि ब्राझीलच्या न्यायाधीशांवर बंदी घालण्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर ‘आपल्याला लोकांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या हे माहित असले पाहिजे. यासाठी प्रशासनाची नाही तर लोकांची काळजी घेणे आवश्यक आहे,’ असे सिल्वा यांनी साओ पाउलो राज्यातील सोरोकाबा शहरात एका कार्यक्रमात सांगितले. आपल्याला देशाची काळजी घ्यायची आहे. लोकांचे रक्षण करणे हे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाचे सार आहे. आम्ही नम्र असून कोणाच्याही दमबाजीला घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट करत ट्रम्प यांचा ‘समाचार’ घेतला.









