केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले स्पष्ट : नक्षलवाद्यांसमोर केवळ एक पर्याय
वृत्तसंस्था/ रायपूर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगड येथे रविवारी पोहोचत नक्षलवादाच्या उच्चाटनाच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे. नक्षलवाद्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही. तसेच 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाच्या उच्चाटनाच्या कालमर्यादेत कुठलाही बदल केला जाणार नाही. नक्षलवाद विरोधातील कारवाई पावसाळा म्हणजेच मान्सूनमध्येही जारी राहणार असल्याचे शाह यांनी सांगितले.
गृहमंत्री शाह याहंनी छत्तीसगडच्या नवे रायपूर येथे राष्ट्रीय फॉरेन्सिक शास्त्र विद्यापीठ (एनएफएसयू) परिसर आणि एका केंद्रीय फॉरेन्सिक शास्त्र प्रयोगशाळेच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना शाह यांनी यंदा नक्षलवाद्यांना मान्सूनमध्ये देखील स्वस्थ बसू देणार नाही, कारण त्यांच्या विरोधातील मोहीम पावसाळ्यातही सुरू राहणार असल्याचे नमूद केले.
दरवेळी पावसाळ्यात नक्षलवाद्यांना आराम मिळत होता. पावसाळ्यात घनदाट जंगलांमध्ये पूर आलेल्या नद्यांमुळे नक्षलविरोधी मोहिमांमध्ये अडथळे निर्माण व्हायचे. परंतु यावेळी आम्ही पावसाळ्यातही नक्षलवाद्यांना सोडणार नाही आणि 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद समाप्त करण्याच्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी वाटचाल करत राहू असे शाह यांनी म्हटले आहे.
नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्रs खाली ठेवावीत
शाह यांनी नक्षलवाद्यांसमोर केवळ एकच पर्याय असल्याचे सांगत त्यांना शस्त्रास्त्रs खाली ठेवत विकासाच्या यात्रेत सामील होण्याचे आवाहन केले. नक्षलवाद्यांसोबत चर्चा आवश्यक नाही. नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रs खाली ठेवत मुख्य प्रवाहात सामील व्हावे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत सरकारच्या धोरणाचा लाभ घ्यावा. शस्त्रास्त्रs खाली ठेवत मुख्य प्रवाहात आलेल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. छत्तीसगड सरकार आणि केंद्राने दिलेले सर्व आश्वासने कुठल्याही स्थितीत पूर्ण केली जातील आणि आम्ही आणखी मदत करण्याचा प्रयत्न करू असे उद्गार शाह यांनी काढले आहेत.









