कोल्हापूर / धीरज बरगे :
कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीच्या पिछाडीस असलेल्या मनोरमा कॉलनीमध्ये ४० वर्षापासून ना रस्ता, ना गटार अशी स्थिती आहे. चार दशकाहून अधिक काळ येथील नागरिक मुलभूत सुविधांच्या प्रतीक्षेतच आहेत. महापालिकेचे सर्व प्रकारचे कर भरुनही रस्ते, गटर, ड्रेनेज अशा प्राथमिक सुबिधा मिळत नाहीत. त्यामुळे कॉलनीमधील नागरिकांमधून महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
कळंबा-गारगोटी रोडवरील एलआयसी कॉलनी परिसरातील सुमारे ३५ घरांची मनोरमा कॉलनी आहे. कळंबा जेलच्या संरक्षक भिंतीलगत कॉलनी असल्याने येथे बांधकामांना मर्यादा आहेत. मात्र गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ येथे नागरिक रहावयास आहेत. या चाळीस वर्षात कॉलनीमध्ये साधा रस्ता देखील झालेला नाही. रस्ते डांबरीकरणाची प्रतीक्षा कॉलनी कळंबा जेलच्या संरक्षक भिंतीलगत असल्याने बांधकामांना मर्यादा आहेत. सद्यस्थितीत येथे सुमारे ३५ घरे आहेत. चाळीस वर्षांहून अधिक काळ ते येथे वास्तव्यास आहेत. मात्र या चार दशकांच्या प्रवासात हि कॉ लनी कायमच दूर्लक्षित राहिली आहे. पावसाळ्यात कॉलनीमधील रस्ता चिखलमय बनत असल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण बनते. येथील नागरिक आजही रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
- महापालिकेने सुविधा पुरवाव्यात
कॉलनीमध्ये मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डांबरी रस्ते, गटार, ड्रेनज लाईन होणे अत्यंत गरजेचे आहे. सुविधांबाबत महापालिकेकडे अनेक वर्ष पाठपुरावा सुरु आहे. मात्र अद्यापही सुविधा मिळालेल्या नाहीत.
विनायक पाटील, नागरिक
- गटार नसल्याने उघड्यावरच सांडपाणी
कॉलनीमध्ये अद्यापही गटार नसल्याने उघड्यावरच सांडपाणी सोडले जात आहे. तर काही नागरिकांनी कंपाउंडलगत मोठा खड्डा करुन त्यामध्ये सांडपाणी सोडले आहे. तसेच ड्रेनजलाईनही अद्याप टाकलेली नाही. त्यामुळे मनोरमा कॉलनी सध्या मुलभूत सुविधांअभावी समस्येच्या गर्तेत सापडली आहे
- आरोग्य धोक्यात
सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचून राहत आहे. यामुळे कॉलनीमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- कर भरुनही सुविधांची वानवा
कॉलनीमधील सर्व नागरिक महापालिकेचे सर्व प्रकारचे कर नियमितपणे भरत आहेत, पण तरीही महापालिका प्रशासन कॉलनीमध्ये प्राथमिक सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहे. गेल्या ४० वर्षांपासून येथील नागरिक प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. कर भरुनही सुविधांची वानवा आहे.








