म. ए. समितीची मागणी : नितीन गडकरी यांची घेतली भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
रिंगरोडमुळे बेळगावमधील शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून याऐवजी बेळगाव परिसरातून फ्लायओव्हर करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. शनिवारी नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांच्यासमोर रिंगरोड विरोधातील व्यथा मांडली.
बेळगाव शहराच्या भोवताली रिंगरोड करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 272 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. केवळ रिंगरोडसाठी सुपीक जमीन घेतली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला बेळगावमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. 69 कि.मी. लांबीचा रिंगरोड करण्याऐवजी 20 कि.मी. लांबीचा फ्लायओव्हर केल्यास रिंगरोडची आवश्यकता भासणार नाही. तसेच वाहतूक कोंडीची समस्याही सोडविण्यास मदत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली.
यासंदर्भात नितीन गडकरी यांना फोटो, सर्व माहितीची सीडी व कागदपत्रे देण्यात आली. त्यांनी या सर्व प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस अॅड. एम. जी. पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, सुनील अष्टेकर, पुंडलिक पावशे, महेश जुवेकर, राजू ओऊळकर, दत्ता उघाडे यांसह इतर सदस्य उपस्थित होते.
चलो मुंबई मोर्चाबाबत शरद पवारांशी चर्चा
सीमाप्रश्नाला गती मिळावी यासाठी 28 फेब्रुवारी रोजी चलो मुंबईचा नारा मध्यवर्ती म. ए. समितीने दिला होता. यासंदर्भात शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी मोर्चासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याबाबतची माहिती जाणून घेतली. प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, महेश जुवेकर, दत्ता उघाडे यांच्याशी त्यांनी चर्चा करून मोर्चाबाबत माहिती दिली.









