पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला वेग
प्रतिनिधी / बेळगाव
विनाहेल्मेट याचबरोबर इतर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना अनेक नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र त्यांनी तो दंड भरला नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने त्या दंडामध्ये 50 टक्के सूट दिली आहे. त्यासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. मात्र तरीदेखील वाहनचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता पोलीस चौकाचौकात थांबून सदर वाहनांवर किती दंड बाकी आहे, याची तपासणी करत आहेत.
वाहनचालकांना विनाहेल्मेट किंवा सिग्नल तोडणे, कार चालविताना बेल्टचा वापर न करणे, वाहनाची नंबर प्लेट नियमानुसार न बसविणे यासंदर्भात नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. जवळपास जिल्ह्यामध्ये 26 कोटी रुपये दंड बाकी आहे. अनेक नोटिसा आल्यातरी वाहनचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता त्यामध्ये 50 टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे.
रहदारी पोलीस स्थानक, बेळगाव वन तसेच लोकअदालतमध्ये हा दंड भरून सुटका करून घेवू शकतात. यासाठी मुदतदेखील देण्यात आली आहे. तरीही वाहनचालकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलीस आता चौकाचौकात थांबून दुचाकी तसेच चारचाकी वाहने अडवून तपासणी करत आहेत.
शहरातील चौकाचौकांमध्ये आता पोलिसांनी वाहनांची कागदपत्रे तपासण्याचा सपाटाच सुरू केला आहे. मात्र यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनचालकांना त्रास देण्याचा प्रयत्न… दंडवसुलीबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करा, असे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक पोलिसाला दररोज तीन ते चार वाहनचालकांकडून दंड वसूल करा, असे सांगण्यात आल्याने बरेच पोलीस आता रस्त्यावरच थांबून आहेत. एकूणच एकप्रकारे वाहनचालकांना त्रास देण्याचाच प्रयत्न असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.









