वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020 च्या दिल्ली दंगलीच्या कटाप्रकरणी आरोपी उमर खालिद, शरजील इमाम, गुलफिश फातिमा आणि मीरान हैदर यांच्या जामीन याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑक्टोबरपर्यंत टाळली आहे. न्यायाधीश अरविंद कुमार आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वाढीव मुदत देण्याची केली होती. एस.व्ही. राजू यांनी दोन आठवड्यांची मुदत न्यायालयाकडे मागितली होती. परंतु खंडपीठाने याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचे सांगितले आहे. जामीन याचिकांप्रकरणी उत्तर दाखल करण्याची आवश्यकता नसते अशी टिप्पणी खंडपीठाने केली आहे.
याचिकाकर्त्यांनी 2 सप्टेंबर रोजीच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 22 सप्टेंबर रोजी देखील सुनावणी झाली होती. तेव्हा दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करत भूमिका मांडण्यास सांगण्यात आले होते. नागरिकांकडून निदर्शने किंवा विरोधाच्या नावाखाली कट रचून होणारी हिंसा अस्वीकारार्ह असल्याचे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळल्या होत्या. याप्रकरणी उमर खालिद, शरजील इमामसोबत गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, मोहम्मद सलीम खान, शिफा-उर-रहमान, अतर खान, अब्दुल खालिद सैफी आणि शादाबा अहमद यांच्याही याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. अन्य आरोपी तसलीम अहमदची याचिकाही 2 सप्टेंबर रोजी वेगळ्या खंडपीठाने फेटाळली होती.









