कर्मचारी संघटनेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या तीन दिवसीय संपाचा तीढा सुटला आहे. मुंबईतील सह्याद्री अथितीगृहात कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत या आंदोलनावर तोडगा निघाला असल्याचे दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
महाराष्ट्रातील भांडुप झोनसाठी वीज वितरण परवाना मागणाऱ्या अदानी वीज कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा सह्याद्री अतिथी गृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “राज्याच्या विजवितरण कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण केले जाणार नाही. उलट शासनाच्या कंपन्यांमध्ये आणखी 50 हजार कोटींची गुंतवणुक करणार आहे. आजच्या बैठकीमध्ये विविध अशा 32 कर्मचारी संघटनांबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झाली.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “वीज कर्मचाऱ्यांसाठी आंदोलकांकडे अधिक चांगली योजना असेल तर तीही आपण आमलात आणू. महावितरण मध्ये येत्या काळात भरतीसाठी वयोमर्यादा कमी करू. कंत्राटी कामगारांना खूपच कमी पगार मिळतो. त्यांच्यासाठी एक वेगळी योजना आणण्यात येईल” असे त्यांनी स्पष्ट केले.