आम्ही एकत्रित आहोत भेदभाव नाही
म्हापसा : काही लोक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरून राजकारण करून आपली पोळी भाजू पाहत आहे. मात्र तमाम कळंगुटवासियांना त्यांचे राजकारण माहीत आहे. या राजकारणी लोकांनी आपण घोड्यावर बसण्यासाठी कळंगुटमध्ये राजकारण करू नये. त्यांनी या पुतळ्यामागे अन्य एक घोडा घालून त्यावर बसावे. नाहक तीच कॅसेट न गिरवता पुतळ्यावर राजकारण करू नका, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो पर्रा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुऊ असलेले राजकारण आता अति झाले. सर्वांना हा विषय राजकीय हेतूने सुरू असल्याचे ज्ञात आहे. त्यामुळे दररोज तोच वाद पुन्हा पुन्हा उकरून काढणे चुकीचे आहे. कळंगुटवासीयांनाही हा वाद नको आहे. असे आवाहन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले आहे. पर्रा येथे एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. जी व्यक्ती या मुद्यावरून राजकारण करीत आहे त्यांनी हे प्रकरण तातडीने बंद करावे. काही व्यक्ती जे सक्रिय राजकारणापासून दुरावले आहेत, निवडणुकीतून पराभव स्वीकारला आहे त्यांना हा वाद आपल्या राजकीय हितासाठी चिघळून पुन्हा नेते व्हायचे आहे. अशाच वृत्तीचे लोक हा वाद चिघळू पाहात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज थोर आहेत. पण काही लोक स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी पुतळ्याच्या वादावरून स्वत:चा फायदा करू पाहत आहेत असेही लोबो म्हणाले.
जुन्या जागी पुतळा उभारा
ज्या जागेवर पूर्वी पुतळा होता त्याच जागी दुसरा पुतळा बसविला असता तर त्याला कोणाचीच हरकत नसती. जुन्या जागीच पुतळा उभारण्याची सूचनाही करण्यात आली होती. त्यासाठी पंचायत, स्थानिक पंच सदस्य यांनी विश्वासात घेऊन तो उभारावा असे सूचित करण्यात आले होते.









