नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सातव्या वेतन आयोगानंतर नवा वेतन आयोग स्थापन होणार नाही, असा संकेत केंद्र सरकारकडून मिळत आहे. भविष्यकाळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱयांचे वेतन किंवा निवृत्ती वेतन यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी नवे निकष क्रियान्वित केले जातील अशी शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
कर्मचाऱयाच्या कामगिरीच्या आधारावरही त्याला वेतनवाढ देण्याचा केंद्राचा विचार आहे. वेतनवाढीच्या इतर निकषांप्रमाणेच कामगिरी हा देखील महत्वाचा निकष मानण्यात येणार आहे. यामुळे जास्तीत जास्त चांगले आणि वेगवान काम करण्यास कर्मचारी प्रवृत्त होतील, असा विचार या निर्णयामागे आहे. मात्र कामगिरीचा निकष नेमक्या कोणत्या आधारावर निर्धारित केला जाईल, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, लवकरात लवकर हे आधार स्पष्ट केले जाण्याची शक्यता आहे.
स्वयंचलित पद्धत आचरणार
कर्मचाऱयाची वेतनवाढ निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार एक सूत्र सज्ज करीत आहे. त्यानुसार स्वयंचलित पद्धतीने वेतनवाढ निश्चित होईल. ज्यावेळी महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या वर जाईल तेव्हा वेतनवाढीचे नवे सूत्र लावण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया संगणकाच्या आधारावर करण्यात येईल. त्यामुळे वादाला जागा उरणार नाही. या पद्धतीला ‘स्वयंचलित वेतन सुधारणा’ (ऍटोमॅटिक पे रिव्हिजन) असे संबोधण्यात येणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच विस्तृत माहितीही देण्यात आलेली नाही.









