कोल्हापूर :
गणेशोत्सवाच्या अवघ्या 22 दिवस आधी कोल्हापुरात सार्वजनिक मंडळांनी तयारीला सुरुवात केली आहे. मात्र यंदा पोलिस विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत फक्त अधिकृत परवानगीनंतरच मंडप उभारणीला परवानगी आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 5 ऑगस्टपासून ‘एक खिडकी योजना‘ शहर उपअधीक्षक कार्यालयात सुरू केली जाणार आहे.
या ठिकाणी मंडळांना मंडप उभारणी, खड्डे खोदण्याची परवानगी, तसेच ध्वनिक्षेपक वापरासाठी परवाने एकाच ठिकाणी मिळतील.
- नियमभंग केल्यास थेट कारवाई
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी 884 मंडळांची नोंदणी झाली होती, मात्र 1131 मंडळांचे विसर्जन झाले. यावरून मोठ्या प्रमाणात मंडळांनी नोंदणीशिवाय गणेशोत्सव साजरा केला हे स्पष्ट होते. यंदा अशी स्थिती होऊ नये म्हणून पोलिसांनी काटेकोर तयारी केली आहे.
प्रत्येक 10 मंडळांसाठी एक पोलिस अधिकारी नेमण्यात येणार आहे. सहायक उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक, आरती व मंडप व्यवस्थापन होणार आहे.
- हे नियम मंडळांनी पाळावेत :
– मंडप बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य
– महिला व पुरुषांसाठी वेगळ्या दर्शन रांगा
– जबरदस्तीने वर्गणी नाही
– ध्वनी मर्यादा आणि वेळेचे पालन
– संपूर्ण रस्त्यावर अडथळा होणार नाही याची खबरदारी
– विनापरवानगी मंडप लावणाऱ्या व नियमभंग करणाऱ्या मंडळांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा सक्त इशारा पोलिस विभागाने दिला आहे.
- विसर्जनासाठी पर्यायी मार्गाला मंडळांची पसंती
गर्दी आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी पोलिसांनी पारंपरिक मार्गाव्यतिरिक्त विसर्जनाचे पर्यायी मार्ग गेल्या दोन वर्षांपासून सुचवले.
2024 मध्ये 726 मंडळांनी उमा टॉकीज चौकहॉकी स्टेडियमसंभाजीनगरइराणी खणी मार्ग वापरला. 164 मंडळांनीच पारंपरिक मार्ग स्वीकारला, त्यातही केवळ सहाच मंडळे रात्री महाद्वार रोडने पुढे गेली.
सर्व मंडळांनी वेळेत नोंदणी करावी, नियमानुसार परवानगी घेऊनच उत्सव साजरा करावा. सहकार्य करून गणेशोत्सव शिस्तबद्ध आणि सुरक्षित पार पाडावा असे आवाहन पोलिसांकडून केले आहे. ही योजनेची माहिती मंडळांसाठी अत्यंत महत्त्वाची असून,परवानग्या मिळवण्यासाठी शहर उपअधीक्षक कार्यालयात वेळेत संपर्क साधावा.








