सुरजेवालांची आमदारांना ताकीद : बेळगाव, कलबुर्गी विभागातील आमदारांशी चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
पक्षातील आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मागील आठवड्यात राज्य दौऱ्यावर आलेले राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला तीन दिवसांनंतर नवी दिल्लीला परतले होते. आता सोमवारपासून ते पुन्हा तीन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी त्यांनी बेळगाव आणि कलबुर्गी विभागातील काँग्रेस आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली आहे. या आमदारांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर त्यांनी कोणीही उघडपणे वक्तव्ये करू नयेत, अशी ताकीद दिली आहे.
राज्य सरकारविरुद्ध सत्ताधारी पक्षातील आमदारांनी उघडपणे नाराजी केल्यानंतर काँग्रेस गोटात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री बदलावरूनही काही आमदारांनी उघडपणे मते मांडल्याने काँग्रेसश्रेष्ठींनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. पक्षातील आमदारांशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्य सचिव आणि राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांना बेंगळूरला धाडण्यात आले होते. त्यानुसार सुरजेवालांनी मागील आठवड्यात बेंगळूर आणि म्हैसूर विभागातील 40 आमदारांशी चर्चा केली होती. आता सोमवारी ते पुन्हा बेंगळुरात दाखल झाले असून तीन दिवस बेळगाव व कलबुर्गी विभागातील आमदारांशी चर्चा करतील. सोमवारी त्यांनी काही आमदारांशी चर्चा केली. काही समस्या असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणू द्या, समस्या सोडविण्यात येतील. उघडपणे वक्तव्ये केल्यास विरोधी पक्षांना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हाती आयतेच कोलीत मिळेल. काहीही असले तरी पक्षाच्या चौकटीतच चर्चा झाली पाहिजे. कोणीही उघडपणे मते मांडू नये, अशी सूचना त्यांनी आमदारांना दिल्याचे समजते.
सोमवारी सकाळपासूनच सुरजेवाला यांनी बेंगळुरातील काँग्रेसच्या इंदिरा भवनमध्ये आमदारांची मते जाणून घेतली. कोणत्या आमदाराच्या मतदारसंघांना सरकारने किती अनुदान दिले?, मतदारसंघात कोणकोणती विकासकामे केली?, सरकारच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल दृष्टिकोन कसा आहे?, याविषयी त्यांनी आमदारांची वैयक्तिक मते जाणून घेतली.
सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरजेवालांनी बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा केली. तर दुपारपासून सायंकाळपर्यंत कलबुर्गी आणि बळ्ळारी जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेतली. मंगळवारी ते विजयनगर, रायचूर, कोप्पळ, हुबळी-धारवाड आणि उत्तर कर्नाटकातील आमदारांशी चर्चा करणार आहेत. बुधवारी हावेरी, चित्रदुर्ग, दावणगेरे, शिमोगा आणि तुमकूर जिल्ह्यातील आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करतील.
बेळगाव जिल्ह्यातील छुप्या संघर्षाचीही तक्रार?
रणदीप सुरजेवालांच्या भेटीवेळी बेळगाव व विजापूर जिल्ह्यातील काही काँग्रेस आमदारांनी मंत्र्यांविषयी तक्रारी केल्या. मंत्र्यांकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नाराजीचा सूरही ओढला. काहींनी बेळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांच्या छुप्या संघर्षाचा उल्लेख करून त्यावर तोडगा न काढल्यास जिल्ह्यातील पक्षसंघटनेवर परिणाम होईल, अशी तक्रारही केल्याचे समजते.
पक्षसंघटनेवर चर्चा : लक्ष्मण सवदी
अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी देखील सुरजेवाला यांची प्रदेश काँग्रेस कार्यालयात भेट घेतली. प्रामुख्याने पक्षसंघटनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत निवडणुका आणि तीन वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याविषयी सुरजेवाला यांच्याशी चर्चा झाल्याचे आमदार सवदी यांनी सांगितले. मतदारसंघनिहाय अनुदानाविषयी सुरजेवालांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली आहेत. मनातील काही मतेही त्यांच्यापुढे मांडल्याचे त्यांनी सांगितले.









