राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील एका वाळवंटी भागात रायधनू नावाचे गाव आहे. हे गाव पूर्णत: वाळवंटी असून सपाट आहे. मात्र, या गावात एक टेकडी आहे. या टेकडीवर 100 वर्षांपूर्वी एक संत झोपडी बांधून राहिला होता. आजही ही झोपडी सुस्थितीत आहे. मात्र, तिचे वैशिष्ट्या असे की, तेथे कोणीही रात्री राहू शकत नाही. तसेच सध्या तिथे कोणीही साधू-संत साधना करु शकत नाही.
याचे कारण एका रहस्यात दडलेले आहे. 100 वर्षांपूर्वी या झोपडीत संत सांवतसिंग नामक साधूने तप:श्चर्या केली होती. याच झोपडीला त्यांनी आपले तपस्यास्थान बनविले होते आणि तिथे त्यांनी समाधीही घेतली आहे. आता हे स्थान भाविकांसाठी आदराचे झाले आहे आणि या टेकडीची परिक्रमा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने येथे भाविक दूरदूरच्या प्रदेशांमधून दरवर्षी येत असतात.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संत सांवतसिंग हे पशूंच्या स्वास्थ्यासाठी येथे तप:चर्या करीत होते. कोणत्याही दुभत्या पाळीव पशूला काही आजार किंवा जखम झाली तर हे संत आपल्या मंत्रून दिलेल्या दोऱ्याने तो आजार बरा करीत होते. त्यामुळे गावकऱ्यांसाठी ते अत्यंत पूजनीय बनले. पण त्यांनी समाधीं घेतल्यानंतर येथे कोणीही रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत राहू शकत नाही. जर कोणी तसा प्रयत्न केलाच तर तो सकाळीं झोपडीतून बाहेर आल्यानंतर त्याची स्मरणशक्तीच नाहीशी होते. त्याला काहीच आठवत नाहीसे होते. आता ही बाब खरी आहे की नाही, हे पडताळून पाहण्यासाठीही येथे कोणी येत नाहीत. कारण समजा, ही बाब खरी असेल आणि आपली स्मरणशक्तीच नाहीशी झाली तर काय करायचे, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यामुळे प्रयोग करुन पाहण्यासाठीही कोणी हा धोका पत्करत नाहीत. त्यामुळे गेली 100 वर्षे ही झोपडी रात्री रिकामीच असते. आणखी एक समजूत अशी आहे की दरवर्षी या झोपडीची पुनर्रचना केली नाही तर त्यावर्षी गावात पाऊस येत नाही. त्यामुळे सर्व गावकरी प्रत्येकवर्षी या झोपडीची पुनर्रचना करतात. अशा प्रकारे हे स्थान एक रहस्य बनून राहिले आहे.









