‘ज्याने चोच दिली, तोच दाणे देतो’, अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा, की परमेश्वराने प्रत्येक सजीवाच्या उदरभरणाची सोय केलेली असते. आपले काम केवळ ती सोय प्रत्येक जीवापर्यंत पोहोचविणे हे असते. उत्तर प्रदेशातील गोवर्धन या इतिहासप्रसिद्ध स्थानी कोणीही व्यक्ती उपाशीपोटी झोपत नाही. कारण, येथे एक साधूबाबा प्रत्येक भुकेल्याच्या अन्नाची सोय प्रतिदिन करतात. त्यामुळे त्यांना रोटीवाले बाबा म्हणून ओळखले जाते. ते या स्थानी कडुलिंबाच्या एका झाडाखाली आपले अन्नछत्र चालवतात. श्रीमंत असो वा गरीब कोणालाही येथे निश्चितपणे अन्न मिळते. जाती-पातीचे भेदाभेदही मानले जात नाहीत. पदपथावरच भुकेल्यांची पंगत बसते आणि जे काही पदार्थ असतील त्यांचा आस्वाद ही मंडळी घेतात.

गोवर्धनमधील परिक्रमा मार्गावर कार्शनी आश्रमाच्याजवळ बनवारीदास नावाच्या परोपकारी साधू पुरुषाने हे अन्नछत्र गेली कित्येक दशके चालविले आहे. हे साधूबाबा भारतीय सेनेतून लान्स नायक पदावरून निवृत्त झालेले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी अन्यत्र नोकरी किंवा व्यवसाय न करता भुकेल्यांना अन्न देण्याचे व्रत स्वीकारले आहे. प्रतिदिन संध्याकाळी सहा वाजता हे अन्नछत्र सुरू होते आणि जोपर्यंत आलेल्या सर्वांना पोटभर अन्न मिळत नाही, तोपर्यंत ते चालते. भात, रोटी, चविष्ट तोंडी लावणी आणि मिष्टान्नही दिले जाते. बाबांना कधीही शिधा कमी पडला नाही. कारण खाणाऱयांपेक्षाही देणाऱयांचे हात अधिक आहेत. हजारो लोक येथे प्रतिदिन तांदूळ, गहू, मसाल्याचे पदार्थ, साखर, गूळ, तूप इत्यादी सामग्री दान करतात. कित्येकदा जेवणाऱयांपेक्षाही मिळालेली साधनसामग्री जास्त असते. त्यामुळे आजपर्यंत त्यांना कधीही धान्याचा तुटवडा पडलेला नाही. आपण अन्नदान करत नाही तर परमेश्वराने निर्माण केलेले अन्न भुकेल्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम फक्त करतो, असे ते विनयशीलतेने म्हणतात. तथापि, पंचक्रोशीत त्यांची ख्याती रोटीवाले बाबा अशीच आहे. हे बाबा प्रतिदिन प्रार्थना करतात आणि जगाच्या पाठीवर कोणावरही उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये, असे साकडे देवाला घालतात. दुपारी चार पासूनच त्यांच्या अन्नछत्रात स्वयंपाक करण्याची लगबग सुरू होते. स्वयंपाक करण्यासाठीही गावातीलच स्वयंसेवक सेवाभावनेने कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगता येतात. हे पुण्यकर्म आहे, असे ते मानतात. गोवर्धन आणि आसपासच्या भागातील गोरगरीबांसाठी हे अन्नछत्र एक आधार बनले आहे.









