कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचा इशारा, झिलतावाडी येथे प्रेरणादिन
काणकोण : आदिवासी समाजातील युवक विविध क्षेत्रांत आज जो लाभ घेत आहेत त्यात मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप यांच्या बलिदानाचे फळ असून गोवा मुक्तीनंतर आदिवासी समाजातील युवकांसाठी सरकारी स्तरावर प्रेरणादिन साजरा करण्याचे सौभाग्य आजवर कोणालाच लाभलेले नाही. संपूर्ण भारतात घडलेली बहुदा ही पहिलीच गोष्ट आहे. अशा वेळी स्व. मंगेश गावकर आणि स्व. दिलीप वेळीप यांच्या नावाने कोणीच राजकारण करू नये, असा स्पष्ट इशारा गोव्याच्या कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिला. झिलतावाडी, गावडोंगरी येथे स्व. मंगेश गावकर यांच्या पुतळ्याच्या परिसराच्या सौंदर्यीकरण केलेल्या भागाचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. ज्या कारणासाठी उटा संघटना स्थापन झाली ती संघटना 2011 सालापासून प्रेरणादिन साजरा करत आहे. यंदाचे हे पहिले तप आहे. सध्या हाच कार्यक्रम सरकारी स्तरावर साजरा होत आहे. ही तमाम आदिवासी समाजाच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. उटाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी केवळ स्वत:चा स्वार्थ पाहिला आणि उटापासून फारकत घेतली. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी हे राजकारणी बाजूला गेले, असा स्पष्ट आरोप गावडे यांनी यावेळी बोलताना केला.
आदिवासी भवनाजवळ पुतळे उभारणार
गोवा सरकारतर्फे पर्वरी येथे उभारण्यात येत असलेल्या आदिवासी भवनजवळ स्व. मंगेश गावकर आणि स्व. दिलीप वेळीप यांचा अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे. आदिवासी समाजातील युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी जे वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे त्यात दोन्ही हुतात्म्यांचे खास दालन असेल, असे सांगून उटा आंदोलन आणि त्यानंतरची परिस्थिती यावर नवलेखकांनी लिखाण करावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. या सोहळ्याच्या व्यासपीठावर माजी मंत्री प्रकाश वेळीप, स्व. मंगेश गावकर यांचे वडील नानू गावकर, विश्वास गावडे, दुर्गादास गावडे, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप, नारायण कामत, गावडोंगरीच्या उपसरंपच सलोनी गावकर, डॉ. उदय गावकर, दया गावकर, मालू वेळीप आदी मान्यवर उपस्थित होते. उटाचे आंदोलन हे लोकशाही मार्गाने झालेले आंदोलन असून 12 मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा आजवर हजारो समाजबांधवांना लाभ झालेला आहे. सरकारची मानवंदना मिळविणाऱ्या स्व. मंगेश गावकर आणि स्व. दिलीप वेळीप या पहिल्या व्यक्ती असून राजकीय मतभेद बाजूला ठेवून ज्या व्यक्ती बाजूला आहेत त्यांनी एकत्र यावे. आम्ही आजवर कोणालाही सोडलेले नाही. राग-रूसवा बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन प्रकाश वेळीप यांनी केले. मंत्री गावडे यांनी स्व. मंगेश गावकर यांच्या माता-पित्यांची त्यांच्या घरात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्या दोघांनाही भावनांना आवर घालता आला नाही. वरील कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विश्वास गावडे यांनी केले, तर दया गावकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गावकर यांनी केले थेवू गावकर, अर्जुन गावकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. संध्याकाळच्या सत्रात मोरपिर्ला, केपे येथे स्व. दिलीप वेळीप यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.









