वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
मल्याळी अभिनेता दिलीपला शबरीमला यात्रेदरम्यान भगवान अयप्पा मंदिरात दर्शनासाठी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता दिलीपला दर्शन घेता यावे म्हणून भाविकांना रोखण्याचा प्रकार गंभीर असल्याचे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अभिनेत्याला दर्शन मिळावे म्हणून सोपानमसमोर पहिल्या दोन रांगांना दीर्घकाळ बंद ठेवण्यात आले होते. त्रावणकोर देवस्थानम मंडळाने (टीडीबी) अशा प्रकारच्या विशेषाधिकारांचा वापर रोखावा असे खंडपीठाने म्हटले.
अभिनेता दिलीप 5 डिसेंबर रोजी दर्शनासाठी शबरीमला येथे पोहोचला होता. तेथे अभिनेता दिलीपला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली होती, यामुळे अन्य भाविकांना त्रास सहन करावा लागला होता. भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत. दीर्घकाळापर्यंत दर्शनात अडथळे निर्माण करणारा अशाप्रकारचा विशेषाधिकार कुणाला देण्यात येऊ नये. मुख्य पोलीस समन्वयक आणि मंडळ सचिवाच्या अहवालानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.









