गेल्या सोमवारपासून रविवारपर्यंत मुंबई शहरात 486.2 तर उपनगरात 579.6 मिमी एवढा पाऊस झाला. तज्ञांच्या मते संततधार आणि दीर्घकाळ पाऊस पायाखालची जमीन भुसभुशीत करण्यास पुरेसा आहे. यातून मुंबईतील टेकड्यांवरील वस्त्यांनी आवश्यक तो धडा घेणे गरजेचे आहे. अन्यथा मुंबईत एखादे माळीण किंवा इर्शाळवाडी होण्यास वेळ लागणार नाही. तरी इर्शाळवाडीत एकूण 43 कुटुंबे होती. मुंबईत भांडूप, विक्रोळी, चेंबूर आदी ठिकाणांवर नजर टाकली तरी दुर्घटनेच्या दहशतीखालील लोकसंख्येची त्वरीत कल्पना येते. सामान्य नागरिक अगतिकतेतून तर लोकप्रतिनिधी अनिच्छेतून धडा मात्र कोणीच घेताना दिसत नाही….
गेल्या आठवडाभरात मुंबई शहरात तसेच उपनगरात माती ठिसूळ होण्याइतपत नक्कीच पाऊस झाला आहे. वारा किंवा पावसाने मातीची झिज झाली की टेकड्यांवरील माती पोखरून टेकड्या वस्त्यांवर कोसळतात असा अनुभव आहे. सध्या पावसाळा सुऊ असून इर्शाळवाडीवरील संकटामुळे राज्यातील टेकड्या, कडे-कपारीतील वस्त्यांची काळजी घेतली जात आहे. अशा वस्त्या असलेल्या भागांमध्ये गुऊवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यवाहीच्या सूचना देण्यास सुऊवात झाली आहे. या कार्यवाहीत काही लोकांना हलविण्यात आले आहे. जिल्हापातळीवर ते सहज होताना दिसून येते. मुंबई महानगरपालिकेने देखील पावसाळ्यापूर्वीच टेकड्यांवरील वस्त्यांना नेहमीप्रमाणे नोटिसा पाठविल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार मुंबईत एकूण 249 दरडप्रवण स्पॉट आहेत. यातील 74 ठिकाणे धोकादायक वर्गात मोडणारी आहेत. त्यातही पूर्व उपनगरात धोकादायक टेकड्या अधिक आहेत. यात भांडूप, विक्रोळी, चेंबूर आणि पवई हा परिसर मोडतो. नुकतेच चेंबूर येथे पंचशील नगरात लँड स्लाईडची घटना झाली होती. तर विक्रोळीचे सूर्य नगर दरड कोसळण्याचे ठिकाण आहे. दरम्यान शहरात डी, एफ नॉर्थ, एफ साऊथ या वॉर्डात दरडप्रवण भाग आहे. या 249 स्पॉटवरील रहिवाशांना पालिका नोटिसा बजावते. तसेच लोकांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोयही करते. मात्र लोकांना तात्पुरता निवारा कऊन दिला तरी देखील ते टेकड्यांवरील वस्त्यांत राहत असल्याचे दिसून येते. त्यांचे दैनंदिन व्यवहार त्याच ठिकाणी असल्याने ते ती जागा सोडायला इच्छूक नसतात. अशावेळी महापालिकादेखील मानवी दृष्टीकोनात अतिमुसळधार पाऊस झाल्यास त्या धोकादायक ठिकाणाहून लोकांना हलविते. साधारण स्थिती झाल्यावर लोक मूळ fिठकाणी परत येतात.
मुंबईतील अशा दरड प्रवण वस्त्यांमध्ये पाऊस जास्त झाल्यास धोका वाढतो. गेल्या सोमवारपासून रविवारपर्यंत शहरात 486.2 तर उपनगरात 579.6 मिमी एवढा पाऊस झाला. एवढा पाऊस टेकड्यावरील जमिनी भुसभुशीत करण्यास पुरेसा आहे. उपरोक्त पावसाची नोंद कुलाबा आणि सांताव्रुझ येथील आहे. मात्र दैनंदिन पावसाची नोंद ही ज्या ज्या परिसरात अधिक पडतो हे पाहणे सयुक्तिक आहे. कारण सांताव्रुझ वेधशाळेत ठेवलेले रेन गेज त्यापासून दूर असलेल्या टेकड्यांच्या विक्रोळीतील पाऊस नोंदी एवढे असेलच असे नाही. रेनगेजपासून दूर असलेल्या उपनगरातील पाऊस नोंदीत मोठा फरक असू शकतो.
पावसाची नेमकी नोंद पाहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता 60 ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रे स्थापली आहेत. यामुळे पावसाची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी संबंधित इशारा दिला जातो. उपनगरात दहिसर, विक्रोळी, मुलुंड, भांडूप, गोरेगांव, भांडूप पवईसारख्या परिसरात पाऊस अधिक होत असल्याचे पाऊस नोंदी सांगतात. या भागातील टेकड्यांवर वस्त्या आहेत. पावसाळा आणि दरड विषयातील ज्येष्ठ अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी मुंबईतील टेकड्यांना घेऊन इशारा दिला आहे. कुलकर्णी यांच्या मते दरड कोसळण्यासाठी त्याठिकाणी दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. त्या टेकडीवर उतार किती आहे. उतार अधिक असल्यास पावसाचे पाणी लगेचच वाहून जाणार आहे. दुसरे म्हणजे त्या ठिकाणी किती काळ पाऊस पडला. दीर्घ काळ पाऊस झाल्यास टेकड्यांवरील वस्त्यांना तो इशारा समजावा. डोंगरावर किंवा टेकड्यांवर मुरलेले पाणी त्या ठिकाणी जमिनीत असलेल्या खडकाला मातीपासून वेगळे करते. हळू हळू ती माती घसरायला लागते. भूस्खलनात माती खाली येणे, दगड खडक खाली येणे असे बरेच प्रकार दरड कोसळण्यात येतात. घाटांमध्ये दगडगोटे खाली येण्याच्या घटना दिसून येतात. मात्र या ठिकाणी नुकसान जास्त दिसून येत नाही. घाटांमध्ये सुऊंग लावल्याने दगड गोटे खाली येतात. सुऊंग लावलेल्या ठिकाणी पाऊस पडल्यावर माती दगड ठिसूळ होऊन खाली येण्याच्या घटना घडतात.
मात्र मुंबईतील टेकड्यांना धोका असून या टेकड्यांखाली झोपडपट्टया उभ्या राहतात. तसेच डोंगराचे पायथे पोखऊन इमारती उभ्या राहत आहेत. असे डोंगर कोसळण्याची भिती तज्ञ व्यक्त करताना दिसून येतात. अशा ठिकाणी एखाद्या आठवड्यात पाऊस अधिक झाल्यास पाणी टेकड्यांवर झिरपल्यास मुरलेले पाणी माती घेऊन खाली झोपड्यांवर येते. अशा घटना कित्येकवेळा यापूर्वी झाल्या आहेत. यावर उपाय म्हणजे दरडी कोसळलेल्या ठिकाणी त्या आठवड्यात किती पाऊस पडला, पावसाचे सातत्य काय होते, तसेच त्या ठिकाणच्या मातीचा प्रकार अशा मुद्यांवर विचार करणे आवश्यक आहे. तसेच अशा टेकड्यांवर पाणी वाहून जाण्याची सोय करणे असे उपाय कुलकर्णी यांनी सुचवले.
मुंबईत टेकड्यांवर राहणाऱ्या मुंबईकरांच्या मनात पावसाळ्यात नेहमी अनामिक भीती घर करते. मुंबईत दरडींवर राहणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून राहण्यासाठी जागा नसल्याने टेकड्या, डोंगरांच्या आधाराने वस्त्या उभ्या राहतात. आता अशा वस्त्यांना तीस ते चाळीस वर्षे उलटून गेली. मात्र भीती कायम आहे. काही विभागांमध्ये टेकड्यांवरील वस्त्यांना नोटिसा बजावल्या जातात. विक्रोळी येथील सूर्या नगर, तर पवईतील देवी नगर, गरिब नगर, गौतम नगर, हरिओम नगर, फुले नगर, इंदिरा नगर या वस्त्या अक्षरश: उंच टेकड्यांवर वसल्या आहेत. या रहिवाशांना मुलभूत गरजांसाठी डोंगराखाली यावे लागत असते. शाळा, ऊग्णालये, पाणी सारख्या दररोजच्या लागणाऱ्या गरजांसाठी सतत खाली यावे लागते. मात्र टेकड्यांवरील वस्तींना आवश्यक असणाऱ्या संरक्षक भिंतीचा अभाव असल्याने आजही प्रश्न उपस्थित केला जातो. इर्शाळवाडीच्या घटनेनंतर पवईतील गौतम नगर व इंदिरा नगर या परिसरात माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या पाठपुराव्याने एस वॉर्ड सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे तसेच अभियंता आणि एनडीआरएफच्या टीमने पाहणी कऊन दुर्घटना टाळण्यासाठी कार्यवाहीचे संकेत दिले आहेत.
मुंबईतील टेकड्यांवर हातावर पोट असणाऱ्यांचीच अधिक गर्दी आहे. टॉवर संस्कृतीने देखील डोंगर पोखरले असून बांधकामे भक्कम उभारली आहेत. मरण हातावर पोट असलेल्या वर्गाचेचे होते. पावसाळा येतो तेव्हा पालिका प्रशासनाकडून दरडी कोसळतील असे सांगत वस्ती खाली करण्याच्या नोटिसांचा सोपस्कार उरकला जातो. मुंबईतही दरडी कोसळतात, वस्त्या दरडींखाली येतात. सामान्य नागरिक अगतिकतेतून तर लोकप्रतिनिधी अनिच्छेतून धडा मात्र कोणीच घेताना दिसत नाही. पालिका प्रशासनासह सरकारनेही त्यावर सकारात्मक विचार कऊन दरडप्रवण वस्त्यांच्या ठिकाणी इतरही पर्याय हाताळून सुरक्षा देण्याचे त्वरेने प्रयत्न केले पाहिजे.
राम खांदारे