माजी क्रीडामंत्री, ‘बीसीसीआय’, ‘आयपीएल’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून स्तुतिसुमने
वृत्तसंस्था/ दुबई
पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी केलेल्या विराट कोहलीवर आता स्तुतिसुमनांचा वर्षाव होऊ लागला असून माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या मते कोहली भारतीय संघाला प्रचंड स्थिरता प्रदान करतो. या सुपरस्टार फलंदाजाने पाकिस्तानविऊद्धच्या शतकादरम्यान दबावाखाली असाधारण संयम दाखवला, असे त्यांनी म्हटले आहे.
कोहलीचे नाबाद शतक हे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविऊद्ध भारताने सहा गडी राखून मिळविलेल्या विजयाचा कणा होते. ‘विराट कोहलीने त्याच्या आक्रमक खेळीद्वारे दबाव कसा हाताळायचा आणि देशासाठी कसे खेळायचे हे दाखवले आहे. विराटने अनेकांची मने आणि देशासाठी सामना जिंकला आहे’, असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ठाकूर यांनी सांगितले. ‘जर विराटच्या खेळीकडे पाहिले, तर तो सुरुवातीपासून कधीही शतकासाठी प्रयत्न करत राहिला नाही हे दिसून येते. त्याने प्राधान्य भारताच्या विजयाला दिले. तो ‘स्ट्राइक’ फिरवत होता, फक्त स्वत:च्या धावांसाठी प्रयत्न करत नव्हता’, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘कोहली शेवटपर्यंत खेळत राहून भारताला सामना जिंकून देऊ इच्छित होता. कोहलीच्या संदर्भातील ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूंसाठी वैयक्तिक डाव फार महत्त्वाचा नसतो, तर देशाचा विजय महत्त्वाचा असतो’, असे ठाकूर पुढे म्हणाले. भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 241 धावांवर रोखल्यानंतर कोहलीने श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलसोबत ‘मॅच विनिंग’ भागीदाऱ्या रचून 45 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. ‘कोहलीचे शतक शानदार होते. ज्या पद्धतीने त्याने शतक झळकावले, ज्या पद्धतीने त्याने भारतीय डावाला स्थिरता दिली, तसे ते अन्य कोणीही करू शकत नाही’, असे शुक्ला म्हणाले.
‘श्रेयस आणि गिल देखील खूप चांगले खेळले. भारतीय संघ पुन्हा पूर्ण फॉर्ममध्ये आला आहे. सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुऊस्त होते आणि ते पाकिस्तानचा सामना करण्यास सज्ज होते आणि त्यांनी ते आपल्या शैलीत केले. संघ अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेला दिसत आहे’, असे शुक्ला पुढे म्हणाले. कोहलीचे पाकविरुद्धचे शतक हे एकदिवसीय सामन्यांतील त्याचे 51 वे शतक असून त्यात केवळ सात चौकार होते. संपूर्ण देश विराटच्या शतकाची वाट पाहत होता, असे आयपीएलचे अध्यक्ष अऊण धुमल यांनी म्हटले आहे.









