फोंडा नगरपालिका निवडणूक : आरक्षण याचिका फेटाळली
फोंडा : फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशीही मंगळवार 11 रोजी एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. मात्र अर्ज नेण्यासाठी बऱ्याच इच्छुक उमेदवारांनी तिस्क फोंडा येथील निर्वाचन अधिकारी कार्यालयात उपस्थिती लावली. फोंडा पालिकेच्या पंधरा प्रभागांसाठी येत्या 5 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वा. अशी असून बहुतेक उमेदवार गुरुवार 13 रोजी अर्ज भरणार आहेत. शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने शनिवार सोडून उर्वरीत सर्व उमेदवार सोमवार 17 रोजी अर्ज दाखल करणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी व घरोघरी प्रचार सुऊ केला असून बहुतेक प्रभागांमध्ये तिरंगी लढत होण्याची संकेत मिळत आहेत.
प्रभाग आरक्षण व फेररचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रभाग आरक्षण व फेररचनेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. काल मंगळवारी या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होऊन ती फेटाळण्यात आली. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रदीप नाईक, माजी नगराध्यक्ष मनोज केणी व माजी उपनगराध्यक्ष विन्सेंत फर्नांडिस यांनी ही संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यात प्रभाग आरक्षण व फेररचनेला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने नियोजित प्रभाग आरक्षणानुसारच निवडणूक होणार आहे.









