मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली ग्वाही : भाजप मेळाव्यातून कामत यांचे शक्ती प्रदर्शन
प्रतिनिधी / मडगाव
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगावच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. गेली काही वर्षे ते विरोधी पक्षात असल्याने म्हणावा त्या पद्धतीने मडगावचा विकास होऊ शकला नाही. आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मडगाव शहराचा विकास नक्कीच होईल व त्यासाठी कुणीही भिवपाची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव शहराच्या विकासाची ग्वाही काल रविवारी मडगावातील भाजपच्या मेळाव्यात बोलताना दिली.
आमदार दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काल रविवारी प्रथमच भाजपने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन घडविले. या मेळाव्याच्या व्यासपीठावर प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार दिगंबर कामत, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक व ऍड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर, भाजपचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक, भाजपचे दक्षिण गोवा प्रभारी सर्वानंद भगत इत्यादी उपस्थित होते.
पक्ष न पाहता मोदींनी विकास केला
या प्रसंगी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, जातीभेद न करता पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी सर्व घटकांचा विकास केलाय. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सरकार कोणत्या पक्षाचे हे न पाहता त्यांनी विकासाला प्राधान्य दिलेय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यातील लोकांची फसवणूक केली. लोकांनी पाच हजार मिळतील यासाठी अर्ज भरले होते, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. केंद्र सरकारच्या योजना पश्चिम बंगालमध्ये रोखून धरल्या जात आहेत. भाजप हा अंत्योदय तत्वावर काम करीत आहे. दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर आरोप केलेत. पण, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासकामाची गती पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उर्वरित सात आमदारांचेही आपण भाजपमध्ये स्वागत केले आहे, असेही ते म्हणाले.
गोव्याला केंद्राकडून 22 हजार कोटींची मदत
गोव्यात भाजपने 22 हजार कोटी रूपयांची मदत दिली. केंद्रात व राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार असल्यामुळेच ते शक्य झाले. यापूर्वी दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. परंतु, त्यांना केंद सरकारडून अपेक्षित असा पाठिंबा मिळाला नाही. पूल, महामार्ग, खेळासाठी स्टेडियम, शिक्षण यात गोवा अग्रेसर आहे. गोवा आयटी सेक्टरमध्येही अग्रेसर आहे. हर घर फायबर नेट सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येईल.
काम करण्याची इच्छा आहे, त्यांना नोकरीची संधी आहे. आम्हाला ग्रीन रोजगाराची संधी उपलब्ध आहे. आयटीआयमध्ये लघु कोर्सेस सुरु केले जातील. जे काही शिक्षण घेईल त्या प्रमाणे रोजगार मिळेल. अन्य राज्यातील लोक येऊन रोजगार मिळवितात तर गोवेकर मागे का? शंभर टक्के लोकांच्या घरात वीज व पाणी उपलब्ध करून दिले आहे. काहीजण याला अपवाद असतील त्याला वेगळी कारणे आहेत. त्याला सरकार जबाबदार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
फातोडर्य़ातील कचरा साफ केला जाईल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचे नाव न घेता, त्यांच्यावर सडकून टीका केली. काही जणांना खाज सुटते एकीकडे व ते खाजवितात दुसरीकडे. आमची आत्ताच सुरवात झालेली आहे. अजून बऱयाच गोष्टी व्हायच्या बाकी आहेत असे म्हणत संभाव्य घडामोडीचा इशाराच दिला. फातोडर्य़ात रस्त्याच्या बाजूला बराच कचरा आढळून येत आहे. हा कचरा साफ केला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. मडगाव व फातोडर्य़ात आत्ता भाजप अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहूल गांधी यांचा महात्मा गांधीजीशी संबंध नाही
राहूल गांधी यांचा महात्मा गांधीजीशी कोणताच संबंध नसल्याचे विधान यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. केवळ महात्मा गांधीजीच्या नावाचा वापर करीत गेली अनेक वर्षे केंद्रात सत्ता उपभोगली. आज राहूल गांधीनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा पूर्ण होईपर्यंत काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडतील व भारत जोडो यात्रा अपयशी ठरल्याचे चित्र समोर येईल असे मुख्यमंत्री म्ह्णाले.
मडगाव शहर आदर्श बनविणार
मडगाव शहर आदर्श बनविण्याचे आपले प्राधान्य आहे. त्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची व सहकार्याची गरज आहे असे आमदार दिगंबर कामत यावेळी बोलताना म्हणाले. भाजपचा आजचा हा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काँग्रेसमध्ये असताना आपल्याला हवा तो निर्णय घेण्याची मोकळीक कार्यकर्त्यांनी दिली होती. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले आहे. आज डिजिटल बँकेची सुरवात करण्यात आली. सेवा पखवाडाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले गेले.
मडगाव पालिकेवर बोलताना कामत म्हणाले की, ज्याच्याकडे नंबर तो सिकंदर.. नंबर नाही तो सिकंदर नव्हे. हात उंचावून मतदान हा योग्य निर्णय. आम्ही कोणतीच ‘नाडपेन्ना’ केली नाही. मडगाव पालिकेवर भाजपचा झेंडा लावला. मडगाव आदर्श शहर करण्यात मुख्यमंत्र्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. सरकारच्या प्रयत्नाना सर्वाचे सहकार्य हवे. मोदींचे हात बळकट केल्यास भारत ‘सुपर पॉवर’ होण्यास वेळ लागणार नाही. सरकारवर टीका ही होईलच त्याला महत्त्व न देता पुढे जाण्याची गरज आहे असे कामत म्हणाले.
दिगंबर कामत भाजपमध्ये लवकरच बऱयापैकी रूळले आहेत. मडगाव भाजप गेली अनेक वर्षे जिंकू शकले नव्हते. दिगंबर कामत हे लोकांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळेच भाजपला हा मतदारसंघ खेचता आला नाही. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गरीब लोकांसाठी झटत आहेत. विकास असो किंवा अन्य विषय त्यांनी सातत्य ठेवले आहे. भाजपने अंत्योदय तत्व पाळले. गेल्या दोन वर्षांत एकही भूक बळी गेला नाही. देशातील गरीबी 22 टक्क्यांवरून 12 टक्के आली असे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले.
मडगाव मतदारसंघात भाजपचे दहा हजार सदस्य करण्याचे आश्वासन दिले आहे. काल त्यातील अडीज हजारजणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचे अर्ज गोपाळ नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्याकडे सुपूर्द केले. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप विजयी होईल असा दावाही त्यांनी केला.
दिगंबर कामत चार महिन्यापूर्वी भाजपमध्ये आले असते तर…
दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये येण्यास थोडासा विलंब केला. जर ते चार महिन्यापूर्वी भाजपमध्ये आले असते तर फातोडर्य़ातही बदल झाला असता असे दामू नाईक यावेळी बोलताना म्हणाले. भाजपचे सरकार आणि विकास यांचे नाते आहे. भाजप सरकार सत्तेवर आहे. मला काय मिळाले असे काहीजण प्रश्न उपस्थित करतात, परंतु, सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतो, याचा त्यांना विसर पडलेला असतो असे दामू नाईक म्हणाले.
यावेळी ऍड. नरेंद्र सावईकर, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मंडळ अध्यक्ष रूपेश महात्मे यांनी सर्वांचे स्वागत केले. नवनाथ खांडेपारकर यांनी सूत्रसंचालन केले.