गृहमंत्री परमेश्वर यांचे स्पष्टीकरण : मात्र विरोधी आमदारांचा सभात्याग
बेळगाव : पंचमसाली लिंगायत समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जबाबत तपासकार्य चालविण्याची आवश्यकता नाही, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले. सोमवारी विधानपरिषदेमध्ये ते बोलत होते. पंचमसाली समाजाला आंदोलन करण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात आली होती. 10 हजार लोकांनी आंदोलन करणे शक्य होते. पंचमसाली समाजाकडून निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलनस्थळावर तीन मंत्र्यांना पाठविण्यात आले होते. पण मुख्यमंत्र्यांनीच आंदोलनस्थळाला आले पाहिजे, अशी हटवादी भूमिका घेऊन आंदोलकांनी सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, असे स्पष्टीकरण गृहमंत्री परमेश्वर यांनी सभागृहात केले. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांनी लाठीचार्ज प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करीत सभात्याग केला.









