संघाच्या पदाधिकाऱयाचे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मांसाहार वर्ज्य नाही आणि देशात यावर बंदीही घातली जाऊ शकत नाही. परंतु गोमांस सेवन टाळले जावे असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी जे. नंद कुमार यांनी काढले आहेत. हे माझे वैयक्तिक मत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली आहे. नंद कुमार हे संघाच्या बौद्धिक शाखा प्रज्ञा प्रवाहचे प्रमुख आहेत.
संघाच्या अनेक सहयोगी संघटना 20 सप्टेंबरपासून गुवाहाटीमध्ये ‘लोकमंथन’ या नावाने बुद्धिवंतांचे तीन दिवसीय संमेलन आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संमेलनाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड करणार असून यात ईशान्येतील राज्यांच्या संस्कृतीवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे नंद कुमार म्हणाले.
काही देशविरोधी शक्ती आमच्या एकतेच्या विरोधात मोहीम राबवत आहेत. आम्ही आमच्या एकतेला बळकट करण्यासाठी स्वतःच्या वैविध्याचा उत्सव साजरा करू इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संघ तसेच हिंदुत्ववादी संघटनांवर स्वतःची विचारसरणी लादण्याचा आरोप काही जणांकडून केला जात असतो. यासंबंधी बोलताना नंद कुमार यांनी मांसाहार वर्ज्य नसून त्यावर बंदी घातली जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
सर्वसामान्य लोक मांसाहारी भोजन करत असतात. मांसाहारावर भारतात बंदी असल्याचे कुणीच म्हणू शकत नाही. हवामानाची स्थिती आणि भौगोलिक स्थानांनुसार लोक आहार घेत असतात. किनारी क्षेत्र आणि ईशान्येतील लोक मांसाहारी आहेत. तेथील लोकांसाठी हाच मुख्य आहार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर बीफ हे वैज्ञानिक आणि पारंपरिक दोन्ही कारणांनी टाळले जावे असे त्यांनी विधान केले आहे.









