प्रशिक्षक ब्रँडन मेकॉलमने स्पष्ट केला भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठीचा इंग्लंडचा पवित्रा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
‘बाझबॉल’ने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजीचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्यांचे किवी प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम यांनी भारताविऊद्धच्या फिरकीस पोषक खेळपट्यांवरील आगामी पाच कसोटी सामन्यांमध्ये निकाल काहीही लागला, तरी त्यांचा संघ आपल्या आक्रमक डावपेचापासून दूर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मॅकलमचे टोपणनाव ‘बाझ’ असून त्याच्याकडून ज्याचा पुरस्कार केला जातो त्या आक्रमक तत्त्वज्ञानानंतर निर्माण झालेल्या ‘बाझबॉल’ या शब्दाला ‘कॉलिन्स डिक्शनरी’मध्ये देखील स्थान मिळाले आहे. ‘बाझबॉल’चा अर्थ कसोटी क्रिकेटची एक अशी शैली आहे ज्यामध्ये फलंदाज अत्यंत आक्रमक पद्धतीने खेळून वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतो. 25 जानेवारीपासून हैदराबाद, विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांत इंग्लंड भारताचा सामना करेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर इनोव्हेशन लॅबच्या ‘लीडर्स मीट इंडिया’मध्ये बोलताना मॅकलम म्हणाला, भारतातील पाच कसोटी सामन्यांमध्ये अतिशय चांगल्या भारतीय संघाचा सामना करण्याचे मोठे आव्हान समोर आहे. मी याबद्दल उत्साहित आहे. कारण सर्वोत्तम संघाविरुद्ध स्वत:ला आजमावून घ्यायचे असते आणि माझ्या मते, भारत त्यांच्या देशी परिस्थितीत सर्वोत्तम आहे. हे आमच्यासाठी चांगले आव्हान राहणार आहे. जर आम्हाला यश मिळाले, तर छानच आहे. नाही मिळाले, तरी आम्ही आमच्या शैलीत खेळून पराभूत होऊ, असे सांगून मॅकलमने भारताविरुद्धच्या मालिकेत त्याचा आणि त्याच्या संघाचा दृष्टिकोन आक्रमकच राहील हे स्पष्ट केले.
यावेळी त्याने ‘बाझबॉल’चा सार आणि त्याचा अर्थ काय यावरही आपले विचार व्यक्त केले. ‘आम्ही हा खेळ खेळत आहोत, कारण आम्हाला क्रिकेट आवडते आणि आम्हाला शक्य तितके चांगले क्रिकेट खेळायचे आहे. त्या स्थानावर असताना त्यातून आनंद मिळेल याची खात्री करून घ्यायची असते आणि त्यासाठी करिअरच्या शेवटपर्यंत थांबू नये. आम्ही खूप नशीबवान आहोत, कारण आम्हाला तत्काळ काही प्रमाणात यश मिळाले. पण माझ्या मते ती आमची कमाल मर्यादा नव्हे’, असेही मॅकलने सांगितले.
‘बाझबॉल’ची प्रेरणा ‘आयपीएल’मधील ‘ती’ खेळी
42 वर्षीय मॅकलमने पहिल्याच आयपीएल सामन्यात 73 चेंडूंत केलेल्या 158 धावांच्या निडर आणि नाबाद खेळीच्या आठवणीही जागविल्या. त्याने त्या खेळीला ‘बाझबॉल’ची प्रेरणा म्हणून श्रेय दिले. ‘मी त्या क्षणाचे दिवास्वप्न पाहतो. कारण त्याने माझे जीवन अक्षरश: बदलले. न्यूझीलंडसाठी मी तोवर फक्त एक क्रिकेटपटू होतो. तिथे तुम्ही कुठले आहात किंवा तुम्ही काय करत आहात, तुमची क्षमता काय आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण त्या दिवसाने मला माझे जीवन बदलण्याची संधी आणि व्यासपीठ दिले’, असे तो म्हणाला.









