अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थी-शेतकऱ्यांचे हाल
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सिंगल व थ्री फेज विद्युतपुरवठा सुरळीत सुरू नाही. यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत. या भागात विद्युतपुरवठा सुरळीत सुरू नसल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांतून होऊ लागल्या आहेत. भागात विद्युतपुरवठा कधी सुरू असतो आणि कधी बंद असतो, याचे वेळापत्रक शेतकऱ्यांना माहिती होत नाही. विद्युत पुरवठ्याअभावी भागातील शेतकरी हतबल झाला आहे. तसेच सिंगल विद्युतपुरवठाही सुरळीत सुरू नाही. यामुळे घरगुती लाईट बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत आहे. घरांमध्ये विद्युतपुरवठा सुरळीत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. वीज सुरळीत नसल्यामुळे अभ्यास करण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली आहे. किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, रणकुंडये, शिवनगर भागात सिंगल व थ्री फेज विद्युतपुरवठा सुरळीत नाही, अशी माहिती काही स्थानिकांनी दिली आहे. एकीकडे सरकारने 200 युनिट वीजपुरवठा मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात अनियमित व अपुरा वीजपुरवठा सुरू असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
रोपलागवडीसाठी कूपनलिका-विहिरींचे पाणी देणे अवघड
किणये भागात वीजपुरवठा सुरळीत नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. दोन दिवसापासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र ज्या शिवारांमध्ये पावसाचे पाणी साचले नाही. या ठिकाणी विहिरी व कूपनलिकांचे पाणी देऊन शेतशिवारात भातरोप लागवडीसाठी चिखल व मशागत करण्यात येऊ लागली आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे कूपनलिका व विहिरींचे पाणी देणे अवघड बनले आहे. तसेच गावांमध्येही वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ लागला आहे. याचा त्रास विद्यार्थी व नागरिकांना होऊ लागला आहे. त्यामुळे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा.
मारुती डुकरे ग्रा. पं. सदस्य किणये









