प्रतिनिधी/ बेंगळूर
मी केंद्रीयमंत्री बनल्यामुळे काँग्रेस नेत्यांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच ते माझ्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी स्वाक्षरी नसणारे प्रकरण समोर ठेवून कारस्थान रचण्यात आले आहे, असा आरोप केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. साई वेंकटेश्वर कंपनीला मी सुईच्या टोकाएवढी देखील जमीन दिलेली नाही. या कंपनीने उत्खनन केलेले नाही. केंद्र सरकारने या कंपनीला परवानगीही दिलेली नाही. त्यामुळे राज्याच्या तिजोरीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. परिस्थिती अशी असताना एसआयटीला माझ्याविरोधात खटला चालविण्यास राज्यपाल परवानगी कशी देतील, असा प्रश्नही कुमारस्वामी यांनी उपस्थित केला.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, राज्य सरकारने केलेल्या षड्यंत्राला घाबरून पळून जाणार नाही. कायदेशीर लढा देईन. इतके दिवस गप्प राहिलेले काँग्रेस नेते आता झोपेतून जागे झाले आहेत. साई वेंकटेश्वर कंपनीच्या खाणकामासाठी जमीन मंजूर केल्याप्रकरणी एसआयटीने माझ्याविरुद्ध राज्यपालांकडे दिलेल्या प्रस्तावावर फेरविचार करण्यास सांगून माघारी धाडले होते. साई वेंकटेश्वर खाणकामासाठी जमीन मंजूर केलेल्या कागदपत्रावरील हस्तलेखन माझे नाही. 6 ऑक्टोबर 2007 पूर्वी हे घडले आहे. त्यावर माझी स्वाक्षरीही नाही. मी त्या कंपनीला जमीनही दिलेली नाही. कोणी घोटाळा केला हे मला ठाऊक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
साई वेंकटेश्वर कंपनीच्या फाईलीवर स्वाक्षरी केल्याचे कुणाच्यातरी सांगण्यावरून कागदपत्रे बाहेर काढल्याचे सांगत फिरणाऱ्यांनी तपास केला का?, एसआयटीने मीच स्वाक्षरी केल्याचे सिद्ध केले आहे का?, असे सांगून कुमारस्वामी यांनी अधिकाऱ्याच्या मुलाच्या बँक खात्यावर 20 लाख रु. जमा झाल्याचे मीच शोधून काढले आहे. तुमच्यापेक्षा कायद्याची अधिक जाण असणारे कोणीतरी आहेत, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार पोन्नण्णा यांना फटकारले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध लोकायुक्त संस्थेत 61 प्रकरणे दाखल आहेत. त्यापैकी 50 प्रकरणांची चौकशीच झाली नसल्याचे प्रसारमाध्यम वृत्तांमधून समजते. याविषयी सिद्धरामय्या कोणती प्रतिक्रिया देतील? आपल्यावर कोणताही डाग नसल्याचे सांगणाऱ्या सिद्धरामय्यांनी लोकायुक्त संस्थेची अवस्था काय केली?, एसीबी कशासाठी अस्तित्वात आणली, असे प्रश्नही कुमारस्वामी यांनी उपस्थित केले.









