वृत्तसंस्था/ माद्रिद
नोव्हाक जोकोविचने टेनिसमधील पिढी बदलल्याचे मान्य केले आहे, ज्यामुळे खेळाडूंचा एक नवीन गट प्रकाशझोतात आला आहे. असे असले, तरी 24 वेळचा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविचने शांतपणे पडद्यामागे जाण्याचा व लुप्त होण्याचा त्याचा अद्याप कोणताही हेतू नाही, असे स्पष्ट केले आहे.
या 37 वर्षीय खेळाडूने 2023 मध्ये चार प्रमुख स्पर्धांपैकी तीन जिंकल्या. परंतु त्यानंतर त्याला तशा प्रकारचा फॉर्म दाखविता आलेला नाही. गेल्या वर्षी मोठ्या स्पर्धांमध्ये त्याचे आव्हान संपुष्टात येऊन जॅनिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ यांनी प्रत्येकी दोन स्पर्धांचे किताब आपल्या नावावर जमा केले. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि अँडी मरे यांच्या निवृत्तीनंतर जोकोविच हा ‘बिग फोर’मधला शेवटचा सदस्य अजूनही खेळत आहे.
आपण या खेळात योगदान देत राहू इच्छितो, असे या सर्बियन खेळाडूने म्हटले आहे. ‘गेली 20 वर्षे बहुतेकदा आम्हा चौघांनी वर्चस्व गाजवले आणि जेव्हा माझे तीन सर्वांत मोठे प्रतिस्पर्धी निवृत्त झाले आहेत तेव्हा वाटते की, एक मोठा बदल झाला आहे’, असे जोकोविच माद्रिद ओपनमध्ये म्हणाला.









